पुणे: शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्याबरोबरच त्यांना शेतमाल विक्री करण्यास कार्यक्षम बनविणार असल्याचे मत राज्याचे कृषी, फलोत्पादन व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळातर्फे आयोजीत येरवडा मध्यवर्ती कारागृह वसाहतीमध्ये सुरु करण्यात आलेल्या संत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडी बाजाराच्या उद्घाटन प्रसंगी श्री. खोत बोलत होते.
यावेळी आमदार जगदिश मुळीक, अप्पर पोलिस महासंचालक डॉ. भुषण कुमार उपाध्याय, कारागृह उपमहानिरिक्षक स्वाती साठे, पणन संचालक डॉ. किशोर तोष्णीवाल, योगेश बिडवई व सिध्दार्थ धेंडे उपस्थित होते.
श्री.खोत म्हणाले शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतमाल विक्रीसाठी कार्यक्षम बनाविण्या येईल. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यात येईल.
तसेच सामान्य नागरिकांनी शेतकऱ्यांच्या संवेदना जोपासाव्यात असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले. आठवडी बाजारात सहभाग नोंदवणाऱ्या शेतकऱ्यांना टेंट उभारण्यास 15 हजार व शेतमाल शेतातून थेट बाजारात नेण्यासाठीच्या वाहन खरेदीस 2 लाखांचे अनुदान देण्यात येणार आहे असे सांगून ते म्हणाले की, राष्ट्रीय किसान बाजार या उपक्रमा अंतर्गत मालवाहक रेल्वेला एक स्वतंत्र डब्बा जोडून महाराष्ट्राचा शेतमाल अन्य राज्यात पाठवून शेतकऱ्यांचा फायदा करुन देणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य बनविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. आठवडी बाजारात शेतकऱ्यांनी लावलेल्या स्टॉलला यावेळी श्री. खोत यांनी भेट दिली.