अजित पवार यांच्या बहिणीच्या ‘मुक्ता पब्लिकेशनवर’ प्राप्तिकर विभागाचा छापा
सातारा-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आयकर विभागाने मोठा धक्का दिला आहे. त्यांच्या साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर छापेमारी करण्यात आली. जरंडेश्वर साखर कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या ताब्यामध्ये आहे.अजित पवार यांची बहीण विजया पाटील यांच्या मुक्ता पब्लिकेशन हाऊसवर देखील प्राप्तिकर विभागाने छापा टाकला आहे. आयकरच्या चार अधिकाऱ्यांकडून मुक्ता पब्लिकेशनमध्ये कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. विजया पाटील यांच्या कोल्हापुरातील घरावर देखील आयकरचे अधिकारी पोहचले आहेत. तर विजया पाटील या पुईखडी इथल्या घरात उपस्थित आहेत.
गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या महाविकास आघाडीमधील नेत्यांवर सातत्याने आरोप करत आहेत. त्यांनी अनेक नेत्यांवर घोटाळ्याचे आरोप केले आहेत. दरम्यान बुधवारी सोमय्या यांनी जरंडेश्वर कारखान्याला भेट दिली होती. यानंतर लगेच ही कारवाई करण्यात आली आहे. सीआरपीएफच्या जवानांची मदत घेऊन छापा टाकण्याची कारवाई सुरू आहे. जरंडेश्वर कारखान्यात एक टीम दाखल झाली असल्याची माहिती समोर येत आहे.
अजित पवार यांच्यांशी संबंधीत सर्वच ठिकाणांवर छापेमारी केली जात असल्याची माहिती आहे. पवारांशी संबंधीत कारखान्यांच्या संचालकांच्या घरी देखील छापेमारी करण्यात आली. यासोबतच दौंड शुगर, आंबलिक शुगर, पुष्पदनतेश्वर शुगर, नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर कारवाई सुरू असल्याची माहिती मीडिया रिपोर्ट्समध्ये देण्यात आली आहे.