पुणे : टिळक चौकातील श्री लकडी पूल विठ्ठल मंदिर परिसरातील देवराईमध्ये देशी झाडांची रोपे लावण्यात आली आहेत. मंदिरात निर्माण होणाऱ्या निर्माल्याचा खत म्हणून वापर करून मंदिर परिसरात देवराई बहरली आहे. यामध्ये आणखी देशी झाडे लावण्यात आली आहेत.
श्री लकडी पूल विठ्ठल मंदिर ट्रस्ट आणि लायन्स क्लब ऑफ पुना सिटी यांच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ट्रस्टचे कोषाध्यक्ष दीपक थोरात, कार्याध्यक्ष दिलीप बांदल, लायन्स क्लब ऑफ पुनाचे पदाधिकारी बजरंग अकडे, भारती विद्यापीठाचे कुलगुरू माणिकराव साळुंखे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. देवराईचे प्रमुख रघुनाथ ढोले यांनी विनामूल्य रोपे दिली.
लायन्स क्लब तर्फे झोनल सेक्रेटरी माहेश्वरी आर.सी., रीजनल चेअरपर्सन सुकेतू शहा, विश्वस्त दिलीप काळभोर, नरेंद्र गाजरे, बाळासाहेब ताठे, महेश अंबिके आणि निरंजन राणे व पांडुरंग गायकवाड, चव्हाण महाराज आदी कर्मचारी हे उपस्थित होते.
दीपक थोरात म्हणाले, दोन वर्षांपूर्वी मंदिर परिसरातील देवराईत देशी झाडांची रोपे लावण्यात आली होती त्याची योग्य काळजी घेतल्याने आज झाडांची चांगली वाढ झाली आहे. त्यामुळे निसर्गाचे अस्तित्व येथे निर्माण झाले आहे. याच बहरलेल्या देवराईत अजून नवीन देशी झाडे लावण्यात आली आहेत. मंदिरात फुले फळे आणि पाने यांच्यापासून निर्माण होणाऱ्या निर्माल्य खत म्हणून वापरले जाते. त्यामुळे झाडांची वाढ चांगल्या पद्धतीने होत आहे. विविध पक्षांचे या देवराईत वास्तव्य वाढले आहे.