पुणे : सर्वांना हक्काच घर मिळवून देण्यासाठी आमचं सरकार कटिबद्ध आहे. झोपडपट्टी पुनर्वसन योजना सर्वाना हक्काचं घर मिळवून देण्यासाठी आहे. या योजनेत काही तांत्रिक अडचणी असल्यास येणाऱ्या काळात त्या नक्कीच दूर करू अशी ग्वाही पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली. कोंढवा येथील कमेला झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे भूमीपूजन समारंभावेळी ते बोलत होते.
यावेळी माजी आमदार मोहन जोशी, शिक्षण तज्ञ पी.ए इनामदार, माजी महापौर प्रशांत जगताप, नगरसेवक हाजीभाई पठाण,हाजी गफूर शेख,नंदा लोणकर,आरती बाबर,कलिंदी पुंडे,स्थायी समितीचे माजी सभापती रशीद शेख,झोपडपट्टी पुनर्वसन अधिकारी पांडुरंग पोळे,उद्योजक कृष्ण कुमार गोयल, विकसक रोहित जोशी, विनीत गोयल आदींसह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री बापट म्हणाले, १२ वर्षांपूर्वी झोपडपट्टी पुनर्वसन ही योजना राज्य सरकारद्वारे सुरु करण्यात आली. मात्र या योजने अंतर्गत फक्त १८ हजार घर बांधण्यात आली आहेत. हे प्रमाण अत्यल्प असून निराशाजनक आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक नागरिकाला हक्काच घर मिळवून देण्याचे स्वप्न पहिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्हीसुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींच स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. झोपडपट्टी वासीयांना हक्काचं घर मिळवून देण्यासाठी एसआरए सारख्या योजना राज्य सरकारच्यावतीने राबवल्या जातात. या योजनेचा जास्तीत जास्त लोकांना फायदा होऊन सर्व सामान्य लोकांना हक्काचं घर प्राप्त व्हावं यासाठी आमच्या सरकारने नेहमीच प्रयत्न केले आहेत. भविष्यातही या योजनेच्या अंमलबाजावणीमध्ये अडचणी आल्यास त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू असेही ते यावेळी म्हणाले.
झोपडपट्टी पुनर्विकास अधिकारी पांडुरंग पोळ यांनी सर्वाना हक्काची घर मिळून देऊन लवकरात लवकर या योजनेचे अस्तित्व संपवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त केली. तर शिक्षण तज्ञ पी.ए इनामदार यांनी हा प्रकल्प पुण्यातला आदर्शवत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.