पुणे : भारतीय समाजामध्ये उत्सवांना महत्वाचे स्थान आहे. त्यामुळेच भारतात गणेशत्सोव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. याकाळात अत्यंत धार्मिकतेचे आणि उत्साहाचे वातावरण असते. पुण्यातही हा गणेश उत्सव तितक्याच मांगल्यमय वातावरणात पार पडेल असा विश्वास पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केला. येथील दगडूशेठ हलवाई गणेश मंडळाच्या देखाव्याच्या कामाचे उद्घाटन पालकमंत्री बापट यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
महापौर मुक्ता टिळक, नगरसेवक हेमंत रासने, दगडूशेठ हलवाई मंडळाचे अध्यक्ष अशोक गोडसे, माणिकराव चव्हाण, महेश सूर्यवंशी आदींसह कार्यकर्त्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
यावेळी पालकमंत्री म्हणाले, गणेश उत्सवाच्या काळात गणपती मंडळांकडून रक्तदान, आरोग्य शिबीर असे विविध समाजपयोगी कार्यक्रम घेतले जात असतात. त्यामुळे गणेश मंडळ समाजाशी एकरूप झालेली असतात. या एकरूपतेमुळे सामाजिक एकोपा वाढण्यास मदत होते.
सुप्रीम कोर्टाने गणेश उत्सवाच्या ध्वनिक्षेपकाबाबत घातलेल्या नियमांबाबत ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक लावता येतो. रात्री उशिरा पर्यंत स्पीकर सुरु ठेवल्याने इतर लोकांना त्याचा त्रास होण्याची शक्यता असते. हा त्रास टाळण्यासाठी सर्वोच्य न्यायालयाने ही बंधने घातली आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणे गरजेचे आहे. पुण्यातील गणेश मंडळे ही या नियमांचे पालन करून अतिशय शिस्तबद्धरित्या यंदाचा गणेश उत्सव साजरा करतील असा माझा विश्वास आहे.
यंदाच्या गणेश उत्सवात दगडूशेठ हलवाई मंडळाकडून ब्रम्ह्स्पती मंदिराचा देखावा उभा करण्यात येणार आहे. गणपती संदर्भातील सर्व शुभचिन्हांचा या मंदिरात वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रतिवर्षी सारखा या वर्षीही भाविकांचा अत्यंत चांगला प्रतिसाद या देखाव्यास प्राप्त होईल. असेही ते यावेळी म्हणाले.