पुणे – दलित महिलांना स्वाभीमानाने जगता यावे यासाठी एका महिन्यात सरकारी पातळीवर मार्गदर्शक संस्था उभारणार असल्याची घोषणा राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी केली.
डॉ. गौतम बेंगाळे आणि डॉ. प्रशांत साठे यांनी लिहिलेल्या आणि ‘ग्राफीक्स प्रकाशन’ने प्रकाशित केलेल्या ‘दलित महिला उद्योजक’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना श्री. कांबळे बोलत होते. ‘बीएमसीसी’चे प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ, डॉ. मुकुंद तापकीर यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. कांबळे पुढे म्हणाले, ‘चार टक्के दराने कर्ज पुरवठा, एमआयडीसीत १० टक्के आरक्षण, मुद्रा कर्जासाठी प्राधान्य अशा सवलती सरकार देत आहे. त्याचा दलित युवकांनी फायदा करून घ्यावा. महिलेच्या नावावर सात बारा असेल तर शेतसारा माफीचा निर्णय करणार आहे.’
प्राचार्य रावळ म्हणाले, ‘विशिष्ट प्रेरणा घेऊन केलेल्या संशोधनाचा संदर्भ म्हणून उपयोग होतो. भूमिकेमागे शास्त्रीय व सांख्यीकीक आधार असणे आवश्यक असते. गुणात्मक बदलासाठी संशोधन आवश्यक आहे. डॉ. बेंगाळे यांचे संशोधन दलित महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी उपयुक्त ठरेल.’
डॉ. बेंगाळे म्हणाले, ‘वंचित घटकांचे स्मरण उपभोगत्या समाजाला राहात नाही. दिवाळीत झाडूची पूजा होते, परंतु ती तयार करणार्या महिलेची पूजा होत नाही. दलित महिलांच्या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी केलेल्या संशोधनातून या पुस्तकाची निर्मिती झाली.’ डॉ. साठे यांनी सूत्रसंचालन व प्रास्ताविक केले.