नागपूर, दि.१८ : देशांतील पहिली मुलींची शाळा जिथे सुरु झाली त्या पुण्यातील भिडे वाड्यात सावित्रीबाई फुले यांच्या नावाने भव्य स्मृतीस्थळ उभारण्यात येणार आहे. अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी बुधवारी पत्रकारांना दिली. सावित्रीबाई फुले यांच्या नावाने उभारण्यात येणा-या या उर्जास्थळाचे काम प्राधान्याने पूर्ण करावे. असे आदेश पुणे महापालिकेला देण्यात आले आहेत. तसेच शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागालाही हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. असेही बापट यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की विधानपरिषदेत आज या संदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.
नागपूर विभागातील शिक्षक लोकप्रतिनिधीं व अन्य काही संस्थांनी भिडे वाड्याचे राष्ट्रीय महत्व सांगणारे निवेदन राज्य शासनाकडे दिले होते. भीडे वाडा येथे देशांतील पहिली मुलींची शाळा सुरु करून महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी स्री शिक्षणाचा शुभारंभ केला होता. म्हणून तेथे सावित्रीबाई यांचे भव्य स्मारक उभे करावे. अशी मागणी या संस्थांनी केली होती. त्याची दखल घेऊन भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर करण्याच्या हालचाली शासकीय स्तरावर सुरु झाल्या आहेत. वाड्याची दुरुस्ती व स्मारकाची उभारणी करण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. पुणे महापालिकेनेही त्यासाठी सुमारे एक कोटी रुपयांची तरतूद केली असून या जागेच्या भूसंपादनाची प्रक्रियाही सुरु झाली आहे. हे काम वेगाने पूर्ण व्हावे यासाठी मी स्वत: प्रयत्नशील आहे.
मुळामुठाचे शुध्दीकरण
पुणे शहरातून वाहणा-या मुळा व मुठा या नद्यांच्या शुध्दीकरणासाठी राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेतून ९९० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. अशी माहितीही बापट यांनी दिली. ते म्हणाले की विधानपरिषदेत हाही विषय आज पटलावर आला होता. नदी पात्रातील पाणी दूषित झाले आहे का ? अशी विचारणा सदस्यांनी केली होती.सदस्यांची ही माहिती खरी असून हद्दीबाहेरील नदी काठच्या गावातून तसेच पुणे महापालिका हद्दीतून मुळा व मुठा नदीत काही प्रमाणात सांडपाणी सोडले जाते. त्याची दखल शासनाने घेतली आहे.असे शासनातर्फे स्पष्ट करण्यात आले. नदी संवर्धन योजनेतून पुणे शहरातील ३९६ दशलक्ष लीटर सांडपाणी प्रक्रिया करून नदीत सोडण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे काम सुरु झाले आहे.
तो २०२२ मध्ये पूर्णत्वास जाईल.यापाठोपाठ पुण्यातील बायसिकल शेअरिंग योजनेचा मुद्दाही विधानपरिषदेत आज उपस्थित झाला. एकात्मिक सायकल आराखड्यानुसार ही योजना पुणे शहरात कार्यान्वित झाली आहे. हा संपूर्ण आराखडा येत्या दोन वर्षात पूर्ण होईल. अशी माहिती शासनातर्फे देण्यात आली. हा आराखडा तयार करतांना शहराचे व्यापक सर्वेक्षण करण्यात आले. तसेच सायकल ट्रॅक विकसित करून त्याचे जाळे तयार करण्यात आले आहे. सायकल पार्किंगसाठी ७९८ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यापैकी १५२ दाट वस्तीत आहेत.