पुणे-माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या कार्याचा गौरव करताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, आबा बागुल यांच्या कल्पकतेला दाद दिलीच पाहिजे. शिवाय दूरदृष्टीने राबविण्यात येणारे नाविन्यपूर्ण प्रकल्प हे राज्यातील सर्वच नगरसेवकांना आदर्शवत आहे. लोकांना बरोबर घेवून कार्य करणारे आबा बागुल युवा पिढीसाठी निश्चितच मार्गदर्शक व्यक्तीमत्त्व आहेत. मला कधी कधी असे वाटते की, आबा यांच्याकडूनच प्रशिक्षण घ्यावे, अशी दूरदृष्टी त्यांच्याकडे आहे. त्यामुळे लवकरच आबा बागुल यांच्यावर पक्षाकडून मोठी जबाबदारी दिली जाणार आहे आणि ती ते यशस्वीरित्या पार पाडतील यात कोणतीही शंका नाही, अशा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या संकल्पनेतून समान पाणीपुरवठा योजनेसाठी उभारण्यात आलेल्या ऑनलाईन वॉटर मीटरींग सिस्टिमचे तसेच ग्रे वॉटर प्रकल्पासह ‘मॅजिक कार्पेट’ या नाविन्यपूर्ण प्रकल्पाचे उद्घाटन आणि भूमिपूजन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी माजी संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजीत कदम, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार मोहन जोशी, माजी गृहराज्यमंत्री व पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यासह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ऑनलाईन वॉटर मीटरींग सिस्टिम हा प्रकल्प खरंच नाविन्यपूर्ण आहे. पुणे शहरासाठी या धर्तीवर पाणीपुरवठ्यासाठी हा प्रकल्प नक्कीच दिशादर्शक ठरणारा आहे. पाण्याची गळती कोठे, वापर किती आणि सर्वांना समान पाणी असा हा प्रकल्प एक शाश्वत पर्याय आहे. प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प सुरू झालेला आहे आणि तो संपूर्ण शहरात राबवावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्ययत केली. ग्रे वॉटर रिसायकलींग या प्रकल्पाला जागतिक स्तरावर प्राधान्य दिले जात आहे. देशात हा प्रकल्प प्रथमच होत आहे. आंघोळीचे आणि स्वयंपाकासाठी वापर झालेल्या पाण्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया करून त्याचा वापर उद्यानांसह स्वच्छतेसाठी होणार असल्याने जवळपास पाच टीएमसी पिण्याच्या पाण्याची बचत होणार आहे. हे दोन्ही प्रकल्प पुणे शहरासाठी दिशादर्शक आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
मेट्रोच्या भूमिपूजनासंदर्भात पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मेट्रोसाठी काँग्रेसच्या काळातच मी स्वत: परवानगी घेतली. पुण्याचा प्रकल्प भाजपने जाणूनबुजून रखडवण्याचे कारस्थान केले. त्यामागे पुण्याबद्दल त्यांना आकसही होता, शिवाय निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी हे डावपेच खेळले. त्यामुळे पुणेकरांनीच मेट्रोला का विलंब झाला? याचा आता जाब विचारला पाहिजे. आज काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आलेले मेट्रोचे भूमिपूजन हे प्रातिनिधिक निषेध म्हणून करण्यात आले. जर सहा महिन्यात नागपुरच्या मेट्रोला परवानगी मिळत असेल, त्यासाठी घाईगडबडीत मान्यता घेतली जात असेल, मग तशी तत्परता पुण्याच्या मेट्रोसाठी का नाही दाखवली, असा सवालही त्यांनी भाजपला उद्देशून केला.
प्रास्तविकात माजी उपमहापौर आबा बागुल म्हणाले, शहराच्या हितासाठी लोकोपयोगी प्रकल्प राबविताना विरोधकांनी मला भरपूर त्रास दिला. ऑनलाईन वॉटर मीटरींग सिस्टिम असो अथवा ग्रे वॉटर प्रकल्प विरोधकांनी खिळ घालण्याचेच राजकारण केले. हे दोन्ही प्रकल्प शहरासाठी दिशादर्शक आहेत आणि देशात ते रोल मॉडेल ठरणार आहेत. केवळ 24 तास पाणीपुरवठा म्हणजे स्मार्ट योजना नाही आणि त्यासाठी 3 हजार कोटींचा कर्जाचा भार पालिकेच्या तिजोरीवर टाकणे हा काही स्मार्ट कारभार नाही. आम्ही म्हणजेच काँग्रेस ज्या ज्या योजना, प्रकल्प राबवतो ते स्मार्टच असतात. काँग्रेस पक्ष हा दिशादर्शक प्रकल्प राबविणारा पक्ष आहे. या पक्षातील प्रत्येक घटक हा नाविन्यपूर्ण प्रकल्पांचा शोध घेणारा आहे, असेही आबा बागुल म्हणाले.