पुणे : माध्यमे आणि राजकीय नेते पक्ष यांच्यावर दबाव टाकणे याबरोबर शालेय शिक्षणातून महात्माजींचे नाव, इंदिराजींचे नाव पुसणे, राजीव गांधीना बदनाम करण्याचे उद्योग भाजपाने सुरु केले आहेत. याचे उच्चाटन करणे गरजेचे आहे. देशाच्या स्वातंत्र्यात ,विकासात भाजपाचे योगदान नाही मात्र ६० वर्षात केवळ हाफ पँट ते फुल पँट इतकेच काय ते यांचे योगदान आहे.असा आरोप भाजपा सरकारवर करीत देशातील नव्या पिढीला महात्मा गांधींची कारकिर्द, इंदिरा गांधींचे योगदान सांगून कॉंग्रेसशी रिकनेक्ट करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले.
कॉंग्रेस अध्यक्षा आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहाचे उद््घाटन चव्हाण यांच्या हस्ते झाले. बालगंधर्व रंगमंदिर येथे झालेल्या कार्यक्रमात कनेक्ट कॉंग्रेस या अभियानाचा प्रारंभ देखील झाला. यावेळी अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस सुशीलकुमार शिंदे, शहर कॉंग्रेस चे अध्यक्ष रमेश बागवे ,मुख्य संयोजक माजी आमदार मोहन जोशी, बाळासाहेब शिवरकर,दिप्ती चवधरी,उल्हास पवार, शरद रणपिसे, आमदार अनंत गाडगीळ, रामदार फुटाणे, अविनाश बागवे , अरविंद शिंदे, आबा बागुल, सदानंद शेट्टी,संगीता तिवारी ,नीता रजपूत ,कैलास कदम, सोनाली मारणे आदी उपस्थित होते. सप्ताहाचे यंदा १३ वे वर्ष आहे. कार्यक्रमात कनेक्ट कॉंग्रेसच्या फेसबुक पेजचे अनावरणही मान्यवरांच्या हस्ते झाले.
अशोक चव्हाण म्हणाले, देशामध्ये भाजपाने सुरु केलेले वैचारिक प्रदूषण वाढत चालले आहे. प्रसार माध्यमांपासून ते सामान्य माणसांपर्यंत प्रत्येकावर दबाव आणण्याचे काम सुरु आहे. नुकतेच राज्य सरकारने ३० टक्के नोकरकपात घोषित केली आहे. त्यात आर्थिक नियोजन नसल्याने राज्यात पेट्रोल, डिझेल महाग झाले आहे. त्यामुळे हे डिसकनेक्ट झालेले सरकार असून कायमस्वरुपी काम करणा-या कॉंग्रेसला जनतेशी रिकनेक्ट करण्याची वेळ आली आहे. तरच सन २०१९ मध्ये देशात आणि राज्यात पुन्हा एकदा कॉंग्रेसचे सरकार येईल. मी लाभार्थी या जाहिरातीमधील खरे लाभार्थी हे सरकारमधीलच आहे. खोटं बोल, रेटून बोलं ही पद्धती अवलंबिली जात आहे. त्यामुळे सेवा, कर्तव्य, त्यागासोबतच जबाबदारपणे आपण कॉंग्रेसला पुढे न्यायला हवे.
सुशीलकुमार शिंदे म्हणाले, कॉंग्रेसच्या काळात तरुणांना नोक-या देण्याचे काम आम्ही केले. मात्र, भाजपाने नोटाबंदी करुन तरुणांच्या नोक-या घालविण्याचे काम केले आहे. आजपर्यंत ४० लाख तरुणांच्या नोक-या गेल्या आहेत. गुजरात निवडणुकांकरीता नरेंद्र मोदी यांनी स्वत:च्या मतदारसंघात दर दिवसाआड बैठका घेतल्या. राहुल गांधींच्या गुजरातमधील मुसंडीला घाबरुन या बैठका होत आहेत. कॉंग्रेसने तलवारीने नाही, तर नेहमीच विचार, सेवा, कर्तव्य आणि त्यागाने लढा दिला आहे. त्यामुळे कनेक्ट कॉंग्रेससारख्या उपक्रमातून पुन्हा एकदा तरुणाईला जोडायला हवे, असेही त्यांनी सांगितले.
मोहन जोशी म्हणाले, कॉंग्रेस पक्षाने गेल्या ६० वर्षांच्या काळात व्यापक प्रमाणात देशउभारणी केली. स्व.राजीव गांधी यांच्या काळात डिजिटलायझेशन आणि संगणकीय युगाची पायाभरणी झाली. परंतु सध्या, कॉंग्रेसने गेल्या ६० वर्षांत काहीही केले नाही, असा अपप्रचार केला जात आहे. त्यामुळे या कॉंग्रेसी योजनांचा लाभ घेऊन पुढे आलेली युवा पिढी आणि दूर गेलेला सुशिक्षीत वर्ग या अपप्रचाराला बळी पडला. त्यांना पुन्हा कॉंग्रेसकडे वळविण्याकरीता कॉंग्रेस कनेक्ट हे अभियान राबविण्यात येणार असून त्याचा प्रारंभ पुण्यामध्ये होत आहे. कार्यक्रमात कनेक्ट कॉंग्रेसच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या सई देशमुख, हर्ष खुनगर, यशपाल जुडावत, विशाल ढोरे, यशराज पारखी, विशाल मांढरे या तरुणाईने देखील मनोगत व्यक्त केले. डॉ.विकास आबनावे यांनी सूत्रसंचालन केले. प्रशांत सुरसे यांनी आभार मानले.