पुणे: पुणे शहरामधील रेड लाईट एरियामध्ये शरीरविक्रय करून उदरनिर्वाह करणाऱ्या महिला तसेच शहराच्या विविध भागातील वस्त्यांमध्ये राहणारे गोर- गरीब व गरजूंना महिनाभर पुरेल असे धान्यवाटप करण्याचा उपक्रम संस्थेने हाती घेतला असून पुढील काही दिवस शहरातील विविध वस्त्यांमधील नागरिकांना या उपक्रमांतर्गत धान्यपुरवठा करणार असल्याची माहिती संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मधुकर पाठक व प्रभारी संचालक डॉ महेश ठाकूर यांनी दिली.
कर्वे समाज सेवा संस्थेच्या वतीने माझगाव डॉक शिप बिल्डर्स मुंबई, सुदर्शन केमिकल्स रोहा, एस एल के ग्लोबल सोलुशन आणि कमिन्स इंडिया यांच्या सहकार्याने महाराष्ट्र राज्यातील काही आदिवासी विभागांमध्ये व पुणे शहरातील विविध वस्त्यांमध्ये धान्य कीट वाटप उपक्रम सुरु असून ठाणेजिल्ह्यातील शहापूर, रायगड जिल्ह्यातील रोहा व पुणे जिल्ह्यातील मावळ व मुळशी तालुक्यातील सुमारे ६९० आदिवासी – कातकरी कुटुंबाना या किटचे वितरण करण्यात आलेले आहे. तसेच पुणे शहरातील सम्राट अशोक विद्यामंदिर व अनुसयाबाई खिलारे विद्यालय येथे पुणे महानगरपालिकेच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या लेबर रिलीफ कॅम्पमधील सुमारे १५० मजुरांना दररोज तीन वेळचे चहा, नाश्ता व जेवण पुरविण्यात येत असून अशा कॅम्पमध्ये राहणाऱ्या मजुरांचे मानसिक समुपदेशन देखील करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे प्रभारी संचालक डॉ महेश ठाकूर यांनी सांगितले.
कर्वे समाज सेवा संस्थेचे प्रभारी संचालक डॉ महेश ठाकूर, प्रा. चेतन दिवाण, व्यवस्थापन समिती समन्वयक प्रसाद कोल्हटकर, सदस्य बालाजी तेलकर यांच्या वतीने तसेच पुणे शहरामधील रेड लाईट एरियामध्ये वास्तव्यास असलेल्या सुमारे ५० महिला व तृतीयपंथीयांना एक महिना पुरेल अशा धान्याच्या किटचे वाटप या परिसरामध्ये काम करणाऱ्या काही संस्था व स्वयंसेवकांच्या पुढाकाराने करण्यात आले. शहरातील विविध भागांमध्ये जाऊन तेथील गरीब वस्त्यांमधील गरीब व गरजू नागरिकांना देखील धान्याच्या किटचे वाटप करण्यात आलेले असून कर्वे समाज सेवा संस्था, महारष्ट्र राज्य शासनाचे दिव्यांग कल्याण आयुक्तालय आणि आदिवासी विभाग यांच्यामार्फत चालविण्यात येत असलेल्या हेल्पलाईनवर फोन करून अन्नधान्यासाठी विनंती करणाऱ्या गरजू नागरिकांना व शहरातील इतर गरजू नागरिकांना देखील गरजेनुसार धान्याच्या किटचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती या हेल्पलाईनचे प्रमुख प्रा. चेतन दिवाण यांनी दिली