पुणे-
ई मोबिलिटी आणि हरित उर्जा या भविष्यवेधी संकल्पनांवर केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात काम करीत आहे. देशात गेल्या काही वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांची वाढती संख्या हे याचेच द्योतक आहे. याबरोबरच हायड्रोजन मिशन संदर्भात देखील केंद्र सरकारने नुकतेच मोठे निर्णय घेतले आहेत. देशाला निरोगी, सुंदर आणि पर्यावरणीय दृष्ट्या समृद्ध जीवनमान देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री डॉ. महेन्द्र नाथ पांडेय यांनी केले.
ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) च्या वतीने स्वदेशी व सर्वाधिक जलद वेगाने इलेक्ट्रिक वाहने चार्ज करणाऱ्या 100KW डीसी फास्ट चार्जरचे अनावरण डॉ. महेन्द्र नाथ पांडेय यांच्या हस्ते आज एआरएआयच्या चाकण येथील सेंटरमध्ये करण्यात आले त्यानंतर चाकण येथील कोर्टयार्ड मॅरिएट येथे झालेल्या एका औपचारिक कार्यक्रमात ते बोलत होते.
एआरएआयचे संचालक डॉ. रेजी मथाई, केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाचे संयुक्त सचिव डॉ. हनीफ कुरेशी, टाटा मोटर्सचे अध्यक्ष व मुख्य तांत्रिक अधिकारी आणि एआरएआयचे अध्यक्ष राजेंद्र पेटकर, एआरएआयचे वरिष्ठ उपसंचालक नितीन धांडे आदी यावेळी उपस्थित होते.
ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) च्या वतीने स्वदेशी व सर्वाधिक जलद वेगाने इलेक्ट्रिक वाहने चार्ज करणाऱ्या 100KW डीसी या फास्ट चार्जरचे अनावरण केंद्रीय अवजड उद्योगमंत्री डॉ. महेन्द्र नाथ पांडेय यांच्या उपस्थितीत करण्यात आले. एआरएआयच्या चाकण येथील सेंटरमध्ये सदर चार्जरचे अनावरण पार पडले. यावेळी एआरएआयचे संचालक डॉ. रेजी मथाई, केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाचे संयुक्त सचिव डॉ. हनीफ कुरेशी, एआरएआयचे वरिष्ठ उपसंचालक डॉ. नितीन धांडे आदी यावेळी उपस्थित होते
एआरएआयच्या पुण्याजवळील ताकवे येथील नवीन मोबिलिटी रिसर्च सेंटरचे ई भूमिपूजन, एआरएआय व एआरएआय एएमटीआयएफ (अॅडव्हान्स मोबिलिटी अँड ट्रान्सफोर्मेशन इनोव्हेशन फाउंडेशन) या अंतर्गत विविध संस्थासोबत सामंजस्य करार, एआरएआयच्या १००० वी क्रॅश चाचणी आदी विविध कार्यक्रम देखील या दरम्यान पार पडले.
यावेळी बोलताना डॉ. महेन्द्र नाथ पांडेय म्हणाले, “भारताला 2030 पर्यंत कार्बन न्यूट्रल आणि 2070 पर्यंत नेट झिरो इमिशन करणारा देश बनविण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून 20 टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट्य आपण वेळेपूर्वीच साध्य केले आहे. आवश्यकतेनुसार आता आम्ही मिथेनॉल देखील व्यावसायिकदृष्ट्या उपलब्ध करून देण्यास तयार आहोत. सरकारचे पेट्रोलियम मंत्रालय, रस्ते व परिवहन मंत्रालय व अवजड उद्योग मंत्रालय या तीनही मंत्रालयांच्या अंतर्गत आम्ही एकत्रितपणे देशातील 22 हजार पेट्रोल पंप निवडणार असून या ठिकाणी चार्जिंग स्टेशन बनविण्यासंदर्भात काम सुरु आहे.”
ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) च्या वतीने स्वदेशी व सर्वाधिक जलद वेगाने इलेक्ट्रिक वाहने चार्ज करणाऱ्या 100KW डीसी या फास्ट चार्जरचे अनावरण केंद्रीय अवजड उद्योगमंत्री डॉ. महेन्द्र नाथ पांडेय यांच्या उपस्थितीत करण्यात आले.त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. महेन्द्र नाथ पांडेय
या चार्जिंग स्टेशनमध्ये एआरएआयने विकसित केलेला हा चार्जर भविष्यात महत्त्वाची भूमिका पार पाडेल, असे सांगत डॉ. पांड्ये पुढे म्हणाले, “भारतातील कुशल मनुष्यबळ हे जागतिक दर्जाचे असून आता वाहनउद्योग क्षेत्रात भारत करीत असलेली प्रगती ही महत्वपूर्ण आहे. आजवर अनेक गोष्टी आयात करणारा आपला देश स्वदेशी तंत्रज्ञान निर्मितीमध्ये आज अव्वल स्थानावर आहे. मात्र यावरच न थांबता त्याची निर्यात आणखी वाढविण्यावर आपण देत असलेला भर महत्वाचा आहे.”
स्टार्ट अप्स व वाहन उद्योगाशी संबंधित केंद्र सरकारच्या योजनांचे कौतुक करीत डॉ. पांडेय म्हणाले, “सरकारच्या या योजनांबद्दल तरुण वर्गामध्ये विशेष उत्साह पाहायला मिळत आहे शिवाय त्यांचा दृष्टीकोन देखील बदलत आहे. आज तरुण वर्गाने नोकरी मिळविणारे नाही तर नोकरी देणारे व्हावे या दृष्टीने त्यांना प्रशिक्षित करायला हवे.”
डॉ. रेजी मथाई यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत करीत गेल्या दोन वर्षांच्या जागतिक महामारीच्या काळात केंद्र सरकारने वाहन उद्योग व संशोधन क्षेत्राला केलेल्या मदतीबद्दल सरकारचे आभार मानले. परवडणाऱ्या दरात वाहनउद्योग क्षेत्राने नजीकच्या भविष्यात या क्षेत्रातील उपायांवर संशोधन करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) च्या वतीने विकसित स्वदेशी व सर्वाधिक जलद वेगाने इलेक्ट्रिक वाहन चार्ज करणाऱ्या 100 KW (किलो व्हॅट) डीसी या फास्ट चार्जरबद्दल अधिक माहिती देताना एआरएआयच्या ओटोमोटीव इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे महाव्यवस्थापक अभिजित मुळ्ये म्हणाले, “आजच्या परिस्थितीत वाहनांमध्ये येणाऱ्या अधिक क्षमतेच्या बॅटरी लक्षात घेत चार्जरची क्षमता आणि चार्ज करण्याचा कमीत कमी वेग या दोन गोष्टी डोळ्यासमोर ठेवत आम्ही केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाच्या मार्गदर्शना अंतर्गत या चार्जरचे संशोधन केले. आज बाहेरील व भारतातील कंपन्या वापरत असलेले चार्जर हे भारतात बनलेले नसल्याने एआरएआयने विकसित केलेला हा चार्जर पूर्णपणे स्वदेशी आहे. याचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे चार्जर मधील इतर सर्व गोष्टींबरोबरच यामधील गाडी व सर्व्हरसोबत प्रामुख्याने काम करणारा कंट्रोलर हा एआरएआयमध्येच विकसित केला गेलेला आहे. या चार्जरमुळे पॅसेंजर कार व इलेक्ट्रिक बस ही वाहने केवळ अर्ध्या तासात चार्ज होणे शक्य आहे. वाहनांसाठीचा हा प्रोटोटाईप लवकरच इच्छुक कंपन्यांकडे त्यांच्या संपूर्ण तांत्रिक माहितीसोबत हस्तांतरित करण्यात येईल.”
ताकवे या ठिकाणी एआरएआयचे होत असलेले मोबिलिटी रिसर्च सेंटर हे 110 एकर परिसरात असून या ठिकाणी गाड्यांसाठी अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टंट सिस्टिम्स (एडीएएस), सिलेंडर टेस्ट सुविधा आणि हाय एनर्जी इम्पॅक्ट टेस्टिंग (एचईआयटी) या महत्त्वाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. अशा पद्धतीची आंतरराष्ट्रीय पातळीवरील सुविधा देणारे हे देशातील पहिले केंद्र असून पुढील एक ते दोन वर्षांच्या काळात ही सुविधा सुरु होणार आहे.
राजेंद्र पेटकर यांनी ‘पाथ वे टू नेट झिरो ‘ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. वाहन उद्योग क्षेत्रातील संशोधन हे समाजाच्या प्रत्येक स्तरातील नागरिकांसाठी महत्त्वाचे असून त्याचा विचार होणे आज गरजेचे असल्याचे मत पेटकर यांनी मांडले. यानंतर एथर एनर्जीचे हरेंद्र सक्सेना यांनी ‘एथर’ चा प्रवास सर्वांसमोर उलगडला. आज एथर सारख्या संस्था उत्पादनात तब्बल 69% स्वदेशी वस्तूंचा वापर करीत असून उरलेले परावलंबित्व देखील लवकरच संपेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमादरम्यान एआरएआयच्या वतीने आयोजित करण्यात येणा-या 18 व्या सिम्पोझियम ऑन ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी (सीआयएटी) प्रदर्शनाची घोषणा करण्यात आली. पुढील वर्षी 23 ते 25जानेवारी, 2024 दरम्यान हे प्रदर्शन पुण्यात होणार असून ‘ट्रान्सफोर्मेशन टूवर्डस प्रोग्रेसिव्ह मोबिलिटी’ या संकल्पनेवर त्याचे आयोजन करण्यात येणार आहे. डॉ. नितीन धांडे यांनी आभार मानले.