पुणे: थोर नेत्यांच्या कुटुंबातले आपण आहोत कि नाही असा विचार आपण करतो. जाती धर्मामध्ये त्यांना अडकवतो. परंतु तसे न करता आपण त्यांच्याच कुटुंबातले आहोत असा विचार करून त्यांच्यातील चांगले गुण घेतले पाहिजे. देशातील नेत्यांची जयंती पुण्यतिथी आपण साजरी करतो, ती त्यांच्यासाठी नाही तर आपल्यासाठी आपण साजरी करायला हवी त्यांचा अंश आपल्यामध्ये यावा म्हणून हे दिन आपण साजरे करायला हवेत, असे मत माजी आमदार प्रा.मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानच्या वतीने अजिंक्य योद्धा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या ३२२ व्या जयंती निमित्त शनिवारवाडा येथे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. माजी नगरसेवक जयंत भावे, इतिहास अभ्यासक मोहन शेटे, प्रतिष्ठानचे सचिव कुंदनकुमार साठे, श्रीकांत नगरकर, माधव गांगल, चिंतामणी क्षीरसागर जगन्नाथ लडकत, रवींद्र कुलकर्णी उपस्थित होते.
मोहन शेटे म्हणाले, थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानच्या वतीने पालखेड मध्ये बाजीराव पेशवे यांनी निजामाला पराभूत केले होते, त्या ठिकाणी त्यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. त्यामुळे बाजीराव पेशवे कशाप्रकारे युद्ध करून विजयी झाले होते हे लोकांना कळेल. फेब्रुवारी २०२३ मध्ये हा पुतळा उभारण्यात येईल. त्यासाठी प्रत्येकाने आपले योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
कुंदन कुमार साठे म्हणाले, एनडीएमध्ये ३५०० किलो वजनाचा थोरले बाजीराव पेशवे यांचा पुतळा पुढील दोन ते तीन महिन्यात उभारला जाईल. पुणे रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्यात यावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली.