पुणे-भाजपच्या आमदार आणि पुणे शहराच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांचं दीर्घ आजारानं गुरुवारी निधन झालं. गेल्याकाही महिन्यांपासून त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या, अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. पुण्यातील गॅलेक्सी केअर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते, याच ठिकाणी त्यांनी दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला.मुक्ता टिळक या लोकमान्य टिळक यांचे पणतू शैलेश टिळक यांच्या पत्नी आहेत.
मुक्ता टिळक या आमदार होण्यापूर्वी पुण्याच्या सन 2017 ते 19 या दरम्यान महापौर होत्या. कसबा विधानसभा मतदारसंघाचे अनेक वर्ष आमदार राहिलेले पुण्याचे विद्यमान खासदार गिरीश बापट यांच्या रिक्त जागेवर मुक्ता टिळक यांची वर्णी लागली होती. त्यानंतर बापट यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी टिळक यांना कसबा विधानसभा मतदारसंघातून निवडून आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले होते. मागील दीड ते दोन वर्षांपासून टिळक या कॅन्सरच्या आजाराने ग्रस्त होत्या. याबाबत त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. पुण्यातील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच गुरुवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली आहे. उद्या सकाळी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनसाठी 9 ते 11 केसरीवाडा येथील राहत्या घरी ठेवण्यात येईल.अंत्यविधी वैकुंठ स्मशामभुमी येथे 11 वाजता होणार आहे.
पुण्यातील भावे स्कूलमधून शालेय शिक्षण घेतलेल्या मुक्ता टिळकांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून पुढील शिक्षण घेतले होते. पुणे विद्यापीठातून त्यांनी जर्मन भाषाही शिकलीय. मार्केटिंग विषयात त्यांनी एमबीएची पदवी मिळवलीय. तसेच मुक्ता टिळकांनी पत्रकारितेचं शिक्षणही घेतले आहे. सुरुवातीच्या काळात त्यांनी हिंदुस्थान पेट्रोलियम, आरबीआय, किर्लोस्कर ऑईल इंजिन्स, थरमॅक्स, प्रवीण मसाले आदी कंपन्यांमध्ये काम केले. मुक्ता टिळक यांच्या माहेरी राजकीय पार्श्वभूमी नव्हती. मात्र, त्यांच्यावर संघाचे संस्कार होते. टिळक घराण्यात आल्यावरच आपसूकच त्यांना राजकीय वारसा मिळाला. त्यांच्या राजकारणाची सुरुवात ही समाजकारणातून झाली.
राज्यसभेसाठी रुग्णवाहिकेतून मतदानासाठी पोहचल्या
राज्यसभा निवडणुकीत एकही आमदार रणांगणाबाहेर राहू नये यासाठी भाजपकडून खबरदारी घेण्यात आली होती. मुक्ता टिळक अॅम्ब्युलन्समधून विधानभवनात पोहोचल्या होत्या. मुक्ता टिळक कर्करोगाशी झुंज देत होत्या. तब्येत खालावलेली असतानाही मुक्ता टिळक राज्यसभेच्या मतदानासाठी आल्या होत्या. मतदानाच्या दिवशी त्यांना अॅम्ब्युलन्समधून विधानभवनात आणले होते.