पुणे- आपल्या वार्डातील ६२ लाखाच्या डांबरीकरण विषयाचा प्रस्ताव स्थायी समिती ची मान्यता होताच ,अध्यक्षांची सही झाल्यावरही ,नगरसचिवांची सही होण्यापूर्वीच राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने चोरून दडवून ठेवल्याने या कामात व्यत्यय आल्याचा आरोप भाजपचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी केला आहे . राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक बाबुराव चांदेरे यांचे नाव घेऊन बालवडकर यांनी हा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे आणि महापौरांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या नगरसचिव कार्यालयातील सावळा गोंधळ चव्हाट्यावर आला आहे.अमोल बालवडकर यांनी महापालिका आयुक्त यांना या संदर्भात पत्र दिले आहे .
यासंदर्भात त्यांनी
म्हटले आहे कि , ६२ लाखाचा डांबरीकरण प्रस्ताव आयुक्त कार्यालयाकडे कसा पोहोचला नाही म्हणून चौकशी केल्यावर हा सारा प्रकार आपल्या लक्षात आला. स्थायी समितीच्या मान्यतेसाठी २६ फेब्रुवारीला हा प्रस्ताव आला .जो नागरिकांच्या मुलभूत गरजा डोळ्यापुढे ठेऊन केला गेला .माझ्या वार्डातील रस्त्यांच्या कामांचा हा प्रस्ताव होता .स्थायी समिती ची मान्यता मिळाल्यानंतर अध्यक्षांची सही होऊन नगरसचीवांची सही होते आणि नंतर हा प्रस्ताव आयुक्त कार्यालयात पाठविला जातो . २६ फेब्रुवारीला प्रस्ताव मान्य झाल्यानंतर देखील तो आयुक्त कार्यालयात पोहोचेना , रोज उद्या ,उद्या चा जयघोष होत गेला तेव्हा या प्रस्तावाचा शोध घेत गेलो तेव्हा हा प्रस्ताव विरोधी पक्षनेता कार्यालयात चांदेरे यांनी मागवून घेतला आणि परत केलाच नसल्याचे समजून आले. दुसरीकडे डांबरीकरण करणाऱ्या ठेकेदारास दम दिला गेला ,वर्क ऑर्डर शिवाय काम केलेस तर बघ आणि एकीकडे अशा पद्धतीने ठराव दडवून त्यापुढील कार्यवाही रखडवून ठेवण्यात आली. २५ मार्च पूर्वी हे काम ठेकेदाराने करणे बंधनकारक होते. संबधित प्रकरणाची चौकशी करून संबधित प्रकरणी दोषींवर कारवाई करावी अशी मागणी बालवडकर यांनी केली आहे.
या प्रकरणी चांदेरे यांना रात्री उशिरापर्यंत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही .