भोपाळ – लोकसभा निवडणुकीत वादग्रस्त वक्तव्यांवरून चर्चेत असणाऱ्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. भोपाळ लोकसभा मतदार संघातून त्यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. साध्वींनी शुभ मुहूर्त पाहून गुफा मंदिराचे दर्शन घेतले. यानंतर पंडितांच्या उपस्थितीत स्वस्तिवाचन मंत्रोच्चार करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचल्या. परंतु, आरोग्याच्या समस्या असल्यामुळे त्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायऱ्या चढण्यात अडचणी आल्या. त्यामुळे फॉर्म भरला तरीही तो दाखल करण्यासाठी त्या पुन्हा मंगळवारी कार्यालय गाठतील. सोबतच, मंगळवारी त्यांचे अर्ज भरण्याची व्यवस्था खालच्या मजल्यावरच करण्यात यावे अशी विनंती सुद्धा साध्वींचे प्रस्तावक उमाशंकर गुप्ता यांनी केली आहे.
माजी मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांची उपस्थिती
फॉर्म दाखल करण्यासाठी साध्वी प्रज्ञा यांच्यासोबत मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि माजी मंत्र्यांसह दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली होती. प्रज्ञा ठाकूर यांच्या उमेदवारी अर्जात कायद्याच्या अडचणी येतील याची जाणीव भाजपला आहे. त्यामुळे, पक्षश्रेष्ठींनी माजी मुख्यमंत्री आणि राज्यातील बड्या नेत्यांना त्यांच्यासोबत राहण्याचे निर्देश दिले आहेत.
जामीन रद्द झाल्यास हा आहे भाजपचा प्लॅन बी..
भाजपकडून खासदारकीच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सध्या जामीनावर आहेत. त्यांचे जामीन रद्द झाल्यास काय करावे यासाठी भाजपने प्लॅन बी तयार केला आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, साध्वींचे जामीन रद्द झाल्यास त्यांच्या जागी भाजप डमी उमेदवार दाखल करण्याच्या तयारीत आहे. परंतु, हा उमेदवार कोण आहे आणि याची प्रक्रिया काय असेल हे अद्याप समोर आलेले नाही. तज्ज्ञांच्या मते, जामीनावर असताना साध्वींना कायद्याच्या पेच प्रसंगांचा सामना करावा लागू शकतो. साध्वींचा जामीन रद्द करण्यासाठी यापूर्वीच कोर्टात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. भाजप नेते अनिल सौमित्र यांनी सांगितल्याप्रमाणे, हा काँग्रेसचाच कटकारस्थान आहे. याच कारणामुळे आम्ही सर्वच पर्याय खुले ठेवले आहेत.