मुंबई-रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील समुद्रकिनारी 2 बोट संशयास्पदरित्या आढळल्याने जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पैकी एका बोटीत एके-47 रायफल्स व स्फोटके सापडले आहेत.राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बोटीबाबत विधिमंडळाच्या सभागृहात माहिती दिली. फडणवीस म्हणाले, रायगडमधील श्रीवर्धन येथील हरिहरेश्वर किनाऱ्यावर एक 16 मीटर लांबीची बोट दुर्घटनाग्रस्त अवस्थेत स्थानिक मच्छिमारांना आढळून आली. त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना कळविल्यानंतर त्या बोटीची पूर्ण तपासणी करण्यात आली. बोटीमध्ये 3 ए. के. रायफल्स आणि दारुगोळा तसेच बोटीशी संबंधित कागदपत्रे आढळून आली. ही घटना निदर्शनास येताच तात्काळ किनारपट्टीवर नाकाबंदीचे आदेश देण्यात आले आणि हाय अलर्ट जारी करण्यात आला.
बोट ऑस्ट्रेलियन महिलेची
फडणवीस यांनी सांगितले, बोटीबाबत तात्काळ भारतीय कोस्टगार्ड व इतर संबंधित यंत्रणांनाही कल्पना देण्यात आली. आतापर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार बोटीचे नाव ‘लेडीहान’ असून तिची मालकी ऑस्टेलियन नागरिक हाना लॉर्डरगन या महिलेची आहे. तिचा पती जेम्स हॉबर्ट हा बोटीचा कप्तान असून ही बोट मस्कतहून युरोपकडे जाणार होती. मात्र, 26 जूनरोजी सकाळी 10 वाजता बोटीचे इंजिन निकामी झाले आणि खलाशांनी मदतीसाठी कॉल दिला. त्यानंतर दुपारी 1 वाजेच्या सुमारास एका कोरिअन युद्ध नौकेने बोटीवरील खलाशांची सुटका केली आणि त्यांना ओमानला सुपूर्त केले.
बोट भरकटत रायगडमध्ये
समुद्र खवळलेला असल्याने ‘लेडीहान’ या बोटीचे टोईंग करता आले नाही. समुद्राच्या अंतर्गत प्रवाहामुळे भरकटत ही नौका हरिहरेश्वर किनाऱ्यावर लागलेली आहे, अशी माहिती भारतीय कोस्ट गार्ड कडून प्राप्त झाल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
केंद्रीय यंत्रणांच्या संपर्कात
फडणवीस यांनी सांगितले, स्थानिक पोलीस आणि दहशतवाद विरोधी पथक हे दोघेही मिळून या घटनेचा तपास करीत आहे. आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर सर्व पोलिस घटकांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. भारतीय कोस्ट गार्ड आणि केंद्रीय संस्था यांच्याशी सतत संपर्क चालू असून बारकाईने पुढील तपास करण्यात येत आहे.