मुंबई –
आज लाल किल्ल्यावरुन जनतेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घराणेशाहीवर टीका केली. देशासमोर घराणेशाही व भ्रष्टाचार ही दोन आव्हाने असल्याचे मोदी म्हणाले. यावर अजित पवारांनी तत्काळ प्रत्युत्तर देत निवडणुकीत जनता उमेदवाराला निवडून देत असेल, तर त्याला घराणेशाही म्हणता येणार नाही, असे म्हटले आहे.
पंडित नेहरु ते राजीव गांधींचा उल्लेख
अजित पवार यांनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरु, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांचे नाव घेत मोदींनी प्रत्युत्तर दिले. पवार म्हणाले, लोकशाहीत निवडणुका महत्त्वाच्या असतात आणि निवडणुकीत समर्थ उमेदवाराला जनतेने निवडून दिल्यास त्याला घराणेशाही म्हणता येणार नाही. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची कारकिर्द आपण पाहिली आहे. त्यांनी देशाला नवी दिशा दिली. इंदिरा गांधी या पोलादी महिला म्हणून जगात लोकप्रिय झाल्या. राजीव गांधींना मिस्टर क्लीन म्हणून ओळखले जात होते. देशाला संगणक युगात नेण्याचे काम त्यांनी केले.
…तर ती घराणेशाही नाही
अजित पवार म्हणाले, कुवत, ताकद, कर्तृत्व नसलेल्या व्यक्तीला बळजबरीने एखाद्या पदावर बसवले असेल तर त्याला घराणेशाही म्हणू शकतो. पंरतू एखाद्याच्या घरात जन्मलेली पुढची पिढी कर्तृत्ववान असेल, लोकांचे नेतृत्व करण्यास समर्थ असेल आणि लोकांनीच आमदार, खासदार म्हणून त्यांना निवडून दिले असेल तर त्याला घराणेशाही म्हणता येणार नाही.
मोदींचे भाषण ऐकले
पंतप्रधान मोदी यांचे भाषण आपण ऐकल्याचेही पवार यांनी सांगितले. पवार म्हणाले, मी मोदींचे भाषण ऐकले. भ्रष्टाचाराचे कुणीही समर्थन करणार नाही. कोणताही नेता, व्यक्ती भ्रष्टाचाराच समर्थन करणार नाही. त्यामुळे भ्रष्टाचार मुक्त भारत असायला हवा, याबाबत दुमत असण्याचे काहीच कारण नाही.
काय म्हणाले होते मोदी?
आज देशवासियांना संबोधित करताना मोदी म्हणाले, सध्या देशासमोर घराणेशाही आणि भ्रष्टाचार ही दोन आव्हाने आहेत. घराणेशाही देशाला पोखरत आहे. दुर्दैवाने, राजकारणात घराणेशाहीमुळे देशाच्या प्रतिभेचे मोठे नुकसान होत आहे. देशात काही असे लोक आहेत, ज्यांच्याकडे राहण्यासाठी जागा नाही आणि काही असे लोक आहेत ज्यांच्याकडे चोरीचे ठेवण्यासाठी जागा नाही.
…तर सरकार गडगडेल
सत्तेचा ताम्रपट कुणीही घेऊन आलेला नाही. सरकारला पाठिंबा देणाऱ्या आमदारांची संख्या कमी होईल, तेव्हा सरकार गडगडेल, असा इशाराही यावेळी अजित पवार यांनी दिला.