अभिनेते-दिग्दर्शक अजिंक्य देव यांना महाराजा यशवंतराव होळकर पुरस्कार
पुणे: ब्रिटिशांचा धोका सर्वप्रथम ओळखत त्यांच्याशी एकहाती सर्वकश युद्धे पुकारत एकापाठोपाठ एक अशा १८ युद्धांत पराभव करणारे आद्य स्वातंत्र्य सेनानी महाराजा यशवंतराव होळकर यांचा जयंतीदिन ३ डिसेंबर रोजी साजरा होत आहे. यानिमित्त होणा-या सोहोळ्यात प्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक श्री अजिंक्य देव यांना महाराजा यशवंतराव होळकर गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून प्रसिद्ध लेखक-संशोधक संजय सोनवणी लिखित “भारतीय स्वातंत्र्याचे प्रणेते महाराजा यशवंतराव होळकर” या पुस्तकाच्या चवथ्या आवृत्तीचेही प्रकाशन होणार आहे अशी माहिती महाराजा यशवंतराव होळकर गौरव प्रतिष्ठानचे सचीव प्रकाश खाडे यांनी दिली.
१७७६ ते १८११ असे केवळ ३१ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या महाराजा यशवंतराव होळकरांनी आपल्या असीम पराक्रमाने व राष्ट्रप्रेमाने तत्कालीन सत्तांना हतबल करून सोडले. ब्रिटिश पार्लमेंटला भारताबाबतची सारे धोरणे बदलावी लागली. तत्कालीन राजा-रजवाड्यांनी यशवंतरावांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला नाही तरी खचून न जाता एकाकी लढा सुरु केला व इंग्रजांना शेवटी शांततेचा तह करायला भाग पाडले. उत्तरेत यशवंतरावांचे हे कार्य माहित असले तरी दुर्दैवाने महाराष्ट्रातच (वाफगांव, जि. पुणे) येथे जन्म घेतलेल्या या वीराची फारशी माहिती नाही. ती व्हावी यासाठी आपले प्रतिष्ठान सदैव प्रयत्न करत असते असेही श्री. प्रकाश खाडे म्हणाले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राज्याचे जलसंधारण मंत्री श्री. राम शिंदे भुषवणार असून प्रमूख अतिथी म्हणुन प्रसिद्ध विचारवंत प्रा. हरी नरके व सामाजिक कार्यकर्ते शी. के. एल. खाडे उपस्थित असणार आहेत. पत्रकार भवन (पुणे) येथे ३ डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता हा कार्यक्रम होईल अशीही माहिती प्रकाश खाडे यांनी दिली.