पुणे, दि. २२: पिंपरी-चिंचवड सेक्टर ४ येथील मागासवर्गीय गुणवंत मुलांचे शासकीय येथे विनामूल्य प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाकरीता अनुसूचित जाती- ५७, विशेष मागास प्रवर्ग -२, अनाथ-२ जागेकरीता प्रवेश देण्यात येणार आहे. पुणे-पिंपरी-चिंचवड, मोशी प्राधिकरण परिसरात इयत्ता ११ वी, पदविका अभ्यासक्रमाचे पहिले वर्ष, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेतलेल्या बाहेरगावच्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्याकरिता वसतिगृहात जावून नोंद करावी.
या वसतिगृहामध्ये प्रवेशितांना विनामूल्य निवास व भोजन, पुस्तके, स्टेशनरी आदीकरीता शासनाने ठरवून दिलेल्या दराची रक्कम, दरमहा निर्वाह भत्ता ८०० रुपये विद्यार्थ्याच्या आधार संलग्न बचत खात्यावर जमा करण्यात येते.
विद्यार्थी हा पुणे, पिंपरी-चिंचवड, मोशी प्राधिकरण येथील महाविद्यालयात शिक्षण घेणारा असावा. प्रवेशासाठी मागील वर्षात उत्तीर्ण झाल्याबाबतची गुणपत्रिका, प्राधिकृत अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीचे जात प्रमाणपत्र, वडिलांचे उत्पन्न प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, चालू महिन्याचे महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र, विद्यार्थी व पालकाचे आधारकार्ड, शिधापत्रिकेची छायांकित प्रत, महाविद्यालय प्रत्यक्ष सुरु असल्याबाबत प्राचार्य यांचे लेटरहेडवर लेखी हमीपत्र या कागदपत्रांची आवश्यकता असल्याची माहिती वसतिगृहाचे गृहपाल एम. डी. वाघमारे यांनी दिली आहे.