पुणे -माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी काल सायंकाळी सात वाजता जेजुरीगडावर जाऊन कुलदैवत खंडोबादेवाचे दर्शन घेतले. कुलधर्म, कुलाचारानुसार त्यांनी तळीभंडार केला.ऐतिहासिक तलवार उचलून देवाचा जयजयकार केला. आपण श्री खंडोबादेवाच्या दर्शनासाठी व देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी येथे आलो असून, राजकीय विषयावर बोलणार नसल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले.

या वेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार सचिन अहिर, जिल्हा शिवसेनाप्रमुख राजेंद्र काळे, पुरंदर तालुका शिवसेनाप्रमुख अभिजित जगताप, हवेली तालुकाप्रमुख संदीप धाडसी, जेजुरी शहरप्रमुख किरण दावलकर, रमेश जाधव, डॉ. प्रसाद खंडागळे, अनिल घोणे आदी उपस्थित होते.
श्री मार्तंड देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त तुषार सहाने, विश्वस्त शिवराज झगडे, पंकज निकुडे पाटील, राजकुमार लोढा, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप, व्यवस्थापक सतीश घाडगे यांनी आदित्य ठाकरे यांचा देवाची प्रतिमा, मूर्ती व घोंगडी देऊन सन्मान केला. जेजुरी नगरपालिकेच्या वतीने देखील त्यांचा सन्मान करण्यात आला

काल सायंकाळी आदित्य ठाकरे यांचे जेजुरी शहरात आगमन झाले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ते जेजुरीगडावर गेले. जेजुरीगडावर श्री खंडोबादेवाचे दर्शन घेतल्यानंतर मंदिरासमोरील कासवावर त्यांनी कुलधर्म, कुलाचारानुसार तळीभंडार्याचा धार्मिक विधी करून भंडार-खोबर्याची उधळण केली.
त्यानंतर देवसंस्थानच्या वतीने ऐतिहासिक तलवारीची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. त्यांनी स्वतः बावीस किलो वजनाची तलवार उचलून ‘येळकोट येळकोट जय मल्हार’चा जयघोष केला. लहानपणी आपण वडिलांबरोबर श्री खंडोबादेवाच्या दर्शनसाठी जेजुरीगडावर आलो होतो. आज देवाचे दर्शन व आशीर्वाद घेण्यासाठी आल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.