पुणे- स्मार्ट सिटीच्या योजनांसाठी पुणे महापालिका आयुक्त घाई करताना दिसतात. मात्र, पुणेकरांची वाहतूक कोंडी फोडण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत आवश्यक असलेल्या हाय कॅपॅसिटी मास्टर ट्रांजिस्ट रूट (एचसीएमटीआर) रस्त्याच्या कामाला गती देण्याकडे आयुक्त कुणाल कुमार दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोप करत माजी उपमहापौर आबा बागूल यांनी आयुक्त कुणाल कुमार यांच्या गाडीला साखळदंडात बांधून निषेध केला.
शहरातील जड वाहतुकीसाठी प्रस्तवित करण्यात आलेल्या रस्त्याचे काम गेल्या 32 वर्षापासून प्रलंबित आहे. या कामाला गती अद्याप मिळाली नाही. प्रत्येक वेळी थोडे काम होऊन ते बंद पडत आहे, असा आरोप बागूल यांनी केला आहे. हा रास्ता 1987 च्या विकास आराखड्यामध्ये दर्शवण्यात आला होता. तेव्हा कामाला नियोजन व सुरुवात झाली असती तर हा रास्ता कमी खर्चात झाला असता. मात्र, त्याचा खर्च 6 कोटींवर गेला आहे. तरी देखील याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे, असा आरोप करत त्याचा निषेध म्हणून आयुक्तांच्या गाडीला साखळदंडाने बांधून ठेवण्यात आल्याचे बागूल यांनी संगितले.
यावेळी आयुक्त कुणाल कुमार यांच्या गाडीवर ‘स्मार्ट सिटी नका करू तर पुणेकरांचा जीव वाचविण्यासाठी एचसीएमटीआर रस्ता पूर्ण करू ‘ अशा वेगवेगळ्या घोषणांचे पोस्टर लावण्यात आले होते. तर संपूर्ण गाडीला साखळदंडात बांधून ठेवण्यात आले होते.