पुणे- नोकरीची नितांत आवश्यकता असणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना नोकरीचे आमिष दाखवून लुबाडणाऱ्या ‘नाजवीन रिटेल प्रायव्हेट लिमिटेड’ या डेक्कन वरील कंपनीच्या कर्मचाऱ्यांविरोधात आज पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. हे बाळासाहेबांच्या युवासेनेच्या वतीने सातत्याने सुरू असलेल्या पाठपुराव्याला मिळालेले यश आहे.असे बाळासाहेबांच्या शिवसेनेचे युवा नेते किरण साळी यांनी म्हटले आहे.
साली यांनी असे सांगितले कि,’ सदर कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून फसवणूक झालेल्या विद्यार्थ्यांनी माझ्याकडे तक्रार केल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांना जाब विचारून दिनांक १० जानेवारी २०२३ रोजी डेक्कन पोलीस स्थानकाच्या अधिकाऱ्यांना फसवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत युवासेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले होते. नोकरीची आवश्यकता असणाऱ्या विद्यार्थ्यांना फसविणाऱ्या लबाडांना शिक्षा झालीच पाहिजे या निर्धारातून आंदोलन करत पाठपुरावा सुरु ठेवला. त्याला यश येऊन फसवणूक करणाऱ्यांविरोधात भारतीय दंडसंहिता अधिनियम 1860 अंतर्गत कलम 420, 342 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यभरातील तरुण-तरुणींना नोकरीच्या आमिषाने गंडा घालणाऱ्या खासगी कंपन्यांना उघडे पाडून शिक्षा होत नाही तोवर विद्यार्थ्यांच्या हितासाठी युवासेनेचे आंदोलन सुरूच राहील. कारण प्रश्न युवकांच्या भविष्याचा आहे आणि ते उज्ज्वल करण्यासाठी युवासेना कटिबद्ध आहे.असेही साळी यांनी म्हटले आहे.