महात्मा फुले यांना भारतरत्न मिळावे आणि फुले वाड्याच्या विकासाला गती मिळावी यासाठी हिवाळी अधिवेशनात विषय मांडणार – डॉ. गोऱ्हे
पुणे, दि. २७ : महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला त्यांच्या वाड्यात आयोजित कार्यक्रमात शिवसेना नेत्या तथा विधान परिषदेच्या माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी अभिवादन करून श्रद्धांजली अर्पण केली.
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे विचार आजही समाजाला दिशा देणारे आहेत. शिक्षणाबरोबरच शेतकरी, कामगार, वंचित आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना महत्त्व देण्याची शिकवण त्यांच्या कार्यातून मिळते. आजच्या सामाजिक परिस्थितीत फुले दाम्पत्याचे विचार अधिक व्यापकपणे समाजापर्यंत पोहोचविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन डॉ. गोऱ्हे यांनी केले.
यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित सुंदर चित्रे साकारली होती. विद्यार्थ्यांनी फुले दाम्पत्याची वेशभूषा करून त्यांच्या कार्याचा संदेश दिला. तसेच फुले यांच्या विचारांचा साहित्य लिहिणारे साहित्यिकांना पुरस्कार देण्यात आले. यावेळी वास्तूंच्या विकासाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, भिडेवाड्यात सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभारणे आणि दोन्ही वास्तूंचा विकास करणे आवश्यक आहे. यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असून, स्थानिक रहिवाशांना न्याय मिळेल असा तोडगा काढण्याचा प्रयत्न आहे.
धरणग्रस्तांच्या प्रश्नांसाठी मावळ परिसरात आठ दिवसांत ८० ते ९० किलोमीटर पदयात्रा केल्याच्या आठवणींनाही त्यांनी उजाळा दिला. तसेच कार्यक्रमात उपस्थित पुणे महानगरप्रमुख तथा माजी आमदार रविंद्र धंगेकर यांचे स्वागत करून त्यांच्या प्रकृतीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. पुरस्कारप्राप्त तिन्ही मान्यवरांनी पुरस्काराच्या अपेक्षेपेक्षा समाजकार्याला प्राधान्य देत आयुष्यभर योगदान दिले आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
महात्मा ज्योतिराव फुले यांना भारतरत्न मिळावे आणि फुले वाड्याच्या विकासाला गती मिळावी, यासाठी ६ ते १८ डिसेंबरदरम्यान नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात हा विषय सभागृहात मांडणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
यावेळी पुणे महानगरप्रमुख तथा माजी आमदार रविंद्र धंगेकर, शिवसेना राष्ट्रीय युवाध्यक्ष किरण साळी, युवासेना सचिव तथा महात्मा फुले वाडा शिवसेना समितीचे अध्यक्ष निलेश गिरमे, ग्रामीण युवासेनेचे नीलेश घारे, एकनाथ ढोले, संदीप शिंदे, मीनल धनवटे यांच्यासह अनेक शिवसेना पदाधिकारी व. कार्यकर्ते,पालक उपस्थित होते.

