सौर ऊर्जा खरेदीचा करार २५ वर्षांचा, साठवणुकीचा मात्र ४० वर्षांचा! फडणवीस सरकारचे उरफाटे धोरण – मुकुंद किर्दत

Date:

कर्जत-भीमाशंकर येथील टोरेंट पॉवरचा प्रकल्प महावितरणसाठी आर्थिकदृष्ट्या तोट्याचा असल्याचा ‘आप’चा दावा; एन्रॉन करारासारखी परिस्थिती निर्माण होण्याचा इशारा

पुणे : कर्जत-भीमाशंकर परिसरातील टोरेंट पॉवरच्या पंप स्टोरेज प्रकल्पामुळे होणारी वृक्षतोड आणि पर्यावरणाची संभाव्य हानी याविरोधात स्थानिक ग्रामस्थ, पर्यावरणप्रेमी आणि विविध राजकीय पक्ष आंदोलन करीत आहेत. आता या प्रकल्पाच्या आर्थिक व्यवहार्यतेवरही आम आदमी पार्टीने गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

सौर आणि पवन ऊर्जेच्या खरेदीचे करार २५ वर्षांचे असताना विद्युत ऊर्जा साठवणुकीचा करार तब्बल ४० वर्षांसाठी करण्यामागील तर्क काय? या करारामुळे महावितरणचे दीर्घकालीन आर्थिक नुकसान होऊन त्याचा बोजा सर्वसामान्य वीजग्राहकांवर पडण्याची शक्यता असल्याचा दावा आम आदमी पार्टीचे मुकुंद किर्दत यांनी पत्रकार परिषदेत केला.

टोरेंट पॉवर आणि महावितरण यांच्यातील करारामुळे जुन्या एन्रॉन ऊर्जा कराराप्रमाणे अव्वाच्या सव्वा पैसे मोजण्याची वेळ येऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला.

ही वीजनिर्मिती नव्हे, तर विजेची साठवणूक!

साईडोंगर एक आणि साईडोंगर दोन या प्रकल्पांचा निम्न जलाशय सामायिक आहे. त्यामुळे दोन्ही प्रकल्पांचा जंगल, जैवविविधता आणि स्थानिक नागरिकांवर होणारा एकत्रित परिणाम अभ्यासण्यात आला आहे का, असा सवाल किर्दत यांनी उपस्थित केला.

पंप स्टोरेज प्रकल्प हा स्वतंत्र वीजनिर्मितीचा प्रकल्प नसून विद्युत ऊर्जा साठविण्याची व्यवस्था आहे. या प्रक्रियेची कार्यक्षमता ७५ टक्के असल्याने साठवणूक आणि पुनर्निर्मितीच्या प्रक्रियेत सुमारे २५ टक्के ऊर्जेची तूट होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात ५९ पंप स्टोरेज प्रकल्प प्रस्तावित असून, त्यांची एकत्रित क्षमता ८१ हजार मेगावॉट असणार आहे. याशिवाय बॅटरी आधारित ऊर्जा साठवणूक प्रकल्पही असतील.

देशाची पंप स्टोरेज प्रकल्पांची अपेक्षित गरज एक लाख मेगावॉट असल्याचे नमूद करत महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या क्षमतेचे प्रकल्प उभारण्याची आवश्यकता काय, असा प्रश्न किर्दत यांनी उपस्थित केला.

दोन महिन्यांत प्रकल्पाचा खर्च साडेसात हजार कोटींनी कसा वाढला?

या प्रकल्पाच्या प्रस्तावातील खर्च आणि आवश्यक जमिनीच्या क्षेत्रफळातील वाढीवरही आम आदमी पार्टीने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

किर्दत यांनी सादर केलेल्या माहितीनुसार,

  • २६ जून २०२३ रोजी तज्ज्ञ मूल्यांकन समितीसमोर (EAC) सादर केलेल्या प्रस्तावात प्रकल्पाचा खर्च १२,०२४ कोटी रुपये दाखविण्यात आला होता.
  • त्यानंतर दोन महिन्यांनी दोन स्वतंत्र प्रकल्प म्हणून प्रस्ताव सादर करण्यात आले.
  • सुधारित प्रस्तावानुसार प्रकल्पांचा एकत्रित खर्च १९,५९३ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला.
  • आवश्यक जमिनीच्या क्षेत्रफळातही १०० हेक्टरची वाढ झाली.

अवघ्या दोन महिन्यांत प्रकल्पाचा खर्च ७,५६९ कोटी रुपयांनी वाढण्यामागील कारणे सरकारने स्पष्ट करावीत, अशी मागणी किर्दत यांनी केली.

साठवणुकीसाठीच प्रति युनिट ४ रुपये ६० पैसे?

२६ सप्टेंबर २०२४ रोजी करण्यात आलेल्या कराराचा संदर्भ देत किर्दत यांनी ऊर्जा साठवणुकीच्या खर्चाची आकडेवारी पत्रकार परिषदेत मांडली.

त्यांच्या म्हणण्यानुसार,

  • दररोज ऊर्जा उपलब्धतेचा कालावधी : ५ तास
  • वार्षिक कालावधी : १,८२५ तास
  • ऊर्जा साठवणूक प्रक्रियेतील तूट : २५ टक्के
  • करारानुसार वार्षिक दर : प्रति मेगावॉट ८३,९८,४०० रुपये
  • साठवणुकीचा अंदाजित खर्च : प्रति युनिट ४.६० रुपये

यामध्ये सौर ऊर्जेच्या खरेदीचा खर्च आणि ऊर्जा प्रक्रियेतील तूट विचारात घेतल्यास महावितरणला प्रत्यक्षात किती दराने वीज उपलब्ध होणार, याचे स्वतंत्र आर्थिक परीक्षण करणे आवश्यक असल्याची भूमिका त्यांनी मांडली.

गुंतवणुकीचा परतावा नऊ वर्षांत, मग करार ४० वर्षांचा का?

टोरेंट कंपनीला विद्युत ऊर्जा साठवणूक प्रकल्पातील गुंतवणुकीचा परतावा साधारण नऊ वर्षांत मिळू शकतो, असा अंदाज किर्दत यांनी व्यक्त केला.

असे असताना कंपनीसोबत ४० वर्षांचा करार करण्याचे कारण काय? बहुतांश सौर आणि पवन ऊर्जा खरेदी करार कमाल २५ वर्षांचे असताना त्याच ऊर्जेच्या साठवणुकीचा करार ४० वर्षांसाठी करणे तर्कसंगत कसे ठरते, असा सवाल त्यांनी सरकारला केला.

भविष्यात सौर ऊर्जेचे दर आणखी कमी होण्याची आणि बॅटरी आधारित साठवणूक तंत्रज्ञान स्वस्त होण्याची शक्यता असताना अशा दीर्घकालीन करारांमुळे महावितरणवर आर्थिक बंधने निर्माण होऊ शकतात, असे त्यांनी सांगितले.

एन्रॉन करारातून सरकारने काय धडा घेतला?

एन्रॉन प्रकल्पाच्या करारामुळे महाराष्ट्राला पूर्वी मोठ्या आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागले होते. तशाच स्वरूपाची चूक पुन्हा होण्याची भीती किर्दत यांनी व्यक्त केली.

टोरेंट पॉवर, जेएसडब्ल्यू निओ एनर्जी आणि अदानी यांसारख्या कंपन्यांच्या फायद्याचे दीर्घकालीन धोरण राज्य सरकार अवलंबत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

ऊर्जा साठवणूक क्षेत्रात मक्तेदारी निर्माण झाली किंवा भविष्यातील स्वस्त तंत्रज्ञान उपलब्ध असतानाही महागड्या करारांचे पालन करावे लागले, तर त्याचा आर्थिक भार अखेरीस सामान्य वीजग्राहकांवर पडेल, असा दावा त्यांनी केला.

पाच हजार रोजगारांचा दावा कितपत खरा?

प्रकल्पामुळे पाच हजार रोजगार निर्माण होणार असल्याच्या दाव्यावरही किर्दत यांनी प्रश्न उपस्थित केला. यापैकी किती रोजगार कायमस्वरूपी असतील आणि किती रोजगार केवळ प्रकल्पाच्या बांधकाम कालावधीपुरते असतील, याचा खुलासा करण्याची मागणी त्यांनी केली.

महाराष्ट्रात ३३ टक्के वनक्षेत्राचे उद्दिष्ट असताना राज्याचे वनक्षेत्र साडेसोळा टक्क्यांपर्यंत असल्याचा दावा करत मोठ्या प्रमाणातील वृक्षतोडीला पर्यायी वृक्षलागवडीचा उपाय कितपत परिणामकारक ठरणार, असा सवाल त्यांनी केला.

सरकारने पर्यावरणीय आणि आर्थिक व्यवहार्यता जाहीर करावी

कर्जत-भीमाशंकर येथील टोरेंट पॉवर प्रकल्पाबाबत राज्य सरकार नागरिकांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे.

या प्रकल्पाचा एकत्रित पर्यावरणीय परिणाम, वाढलेला खर्च, ऊर्जा साठवणुकीचा प्रत्यक्ष दर, दीर्घकालीन कराराची आवश्यकता आणि कायमस्वरूपी रोजगारनिर्मिती याबाबत सरकारने पारदर्शक माहिती जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली.

या पत्रकार परिषदेला मुकुंद किर्दत यांच्यासह आम आदमी पार्टीचे सुभाष करांडे, शंकर थोरात, सुनील सवदी, निरंजन अडागळे आणि श्रीकांत भिसे उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘जरा याद करो कुर्बानी…’; बालगंधर्व चौकात २६/११ च्या शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली

पोलीस मित्र संघटनेचा उपक्रम; शहीद पोलीस अधिकारी, जवान आणि...

यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत महाराष्ट्र घडवला

-काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सचिव मोहन जोशी पुणे : स्व.यशवंतराव चव्हाण...

कोर्टासमोरील मंदार किवळे हल्ला प्रकरणात अवघ्या काही तासांत पाच संशयित ताब्यात!

दोन कथित सूत्रधारांसह तीन संशयित हल्लेखोर पोलिसांच्या जाळ्यात; मंदार...

पुणे मेट्रोची आणखी दोन स्थानके खुली; आता विमानतळाशी मेट्रो जोडण्यासाठी प्रयत्न – मुरलीधर मोहोळ

बालेवाडी हायस्ट्रीट आणि बालेवाडी फाटा स्थानके प्रवासी सेवेत दाखल;...