पुणे, दि.२३: टपाल विभागाच्या पुणे ग्रामीण विभागातील निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतन धारकांच्या प्रलंबित तक्रारींच्या निवारणासाठी ४ डिसेंबर २०२६ रोजी पोस्टल पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे. ही अदालत सकाळी ११ वाजता शिवाजीनगर, पुणे येथील अधीक्षक डाक कार्यालय, पुणे ग्रामीण विभागाच्या कार्यालयात होणार आहे.
टपाल विभागातून सेवानिवृत्त झालेल्या किंवा सेवेत असताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शनविषयक लाभांबाबतच्या तक्रारी, ज्या तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ प्रलंबित आहेत, अशाच तक्रारी या अदालतीत विचारात घेतल्या जाणार आहेत.
पेन्शनधारकांनी आपली तक्रार विहित नमुन्यात दोन प्रतींमध्ये सादर करावी. तक्रार अर्ज विभागीय लेखाधिकारी अथवा स्टेनो यांच्याकडे प्रत्यक्ष जमा करता येईल किंवा dopunemuffasil.mh@indiapost.gov.in या ई-मेलवर पाठवता येईल.
तक्रार अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर २०२६ असून, त्यानंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा पेन्शन अदालतीत विचार केला जाणार नाही. वारसाहक्कासारखे निव्वळ कायदेशीर मुद्दे, वेतनवाढीशी संबंधित प्रकरणे, धोरणात्मक बाबींशी निगडित शिस्तभंग प्रकरणे तसेच विभागीय पदोन्नती समितीच्या (DPC) पुनर्विलोकनासाठी प्रलंबित असलेली प्रकरणे या अदालतीत विचारात घेतली जाणार नाहीत.
पेन्शनधारकांनी स्वतःची तक्रार स्वतंत्रपणे सादर करावी; सामूहिक तक्रारी किंवा इतरांच्या वतीने सादर केलेल्या तक्रारी स्वीकारल्या जाणार नाहीत.
पेन्शनविषयक प्रलंबित तक्रारींचे निराकरण करण्यासाठी संबंधितांनी मुदतीत अर्ज सादर करण्याचे आवाहन टपाल विभागाने केले आहे.

