महापालिकेच्या जागेवर पथारीवाल्यांना जागा देऊन कथित भाडेवसुली? सत्ताधारी नगरसेवकाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह; सातारा रस्त्यावरील ट्रक टर्मिनसच्या जागेचाही मुद्दा ऐरणीवर
पुणे : पुणे शहर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी महापालिका प्रशासनाने आता प्रत्यक्ष मैदानात उतरून कारवाईचा वेग वाढवला आहे. आयुक्त नवल किशोर राम यांच्या निर्देशानुसार शहरातील विविध भागांत अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात येत असून, अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यादेखील स्वतः रस्त्यावर उतरून कारवाईची पाहणी करत आहेत. गंगाधाम चौक ते लुल्लानगर परिसरात त्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांकडून कारवाईचा आढावा घेतला आणि प्रभावी कार्यवाहीच्या सूचना दिल्या. मात्र, या कारवाईच्या निमित्ताने गंगाधाम परिसरातील अतिक्रमणांमागे असलेल्या कथित राजकीय वरदहस्ताचा मुद्दाही चर्चेत आला आहे.
गंगाधाम परिसरात महापालिकेच्या मालकीच्या जागेचा वापर पथारीवाल्यांना व्यवसायासाठी करून देण्यात आला होता. एका सत्ताधारी नगरसेवकाने स्वतः भाडे घेऊन पथारीवाल्यांना महापालिकेच्या जागेवर व्यवसाय करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. वर्षानुवर्षे हा प्रकार सुरू असल्याचे परिसरातील नागरिकांना माहीत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या अतिक्रमणांना राजकीय संरक्षण मिळत होते का आणि महापालिकेच्या सार्वजनिक मालमत्तेचा वापर खासगी आर्थिक फायद्यासाठी केला जात होता का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
अतिरिक्त आयुक्त थेट रस्त्यावर; कारवाईत हस्तक्षेप करणाऱ्यांनाही इशारा?
गंगाधाम चौक ते लुल्लानगर परिसरातील अतिक्रमण हटाव मोहिमेची अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी स्वतः पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून कारवाईची माहिती घेत प्रभावी आणि नियोजनबद्ध कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
या कारवाईच्या पार्श्वभूमीवर कोणताही नगरसेवक असो, अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेत हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, असा अप्रत्यक्ष संदेश प्रशासनाकडून दिला जात असल्याची चर्चा आहे. कारवाईत अडथळा आणणाऱ्या लोकप्रतिनिधीविरोधात वरिष्ठांकडे तक्रार करून त्याच्या पदाबाबतही कारवाईची मागणी होऊ शकते, असे संकेत या भूमिकेतून मिळत असल्याचे बोलले जात आहे.
गंगाधामपुरतेच नव्हे, सातारा रस्त्यावरील ट्रक टर्मिनसचाही मुद्दा!
गंगाधाम परिसरातील कथित भाडेवसुलीचा विषय समोर येत असतानाच महापालिकेच्या सातारा रस्त्यावरील ट्रक टर्मिनसच्या जागेचाही मुद्दा चर्चेत आला आहे. संबंधित नगरसेवकाने या ठिकाणीही अशाच पद्धतीने महापालिकेच्या जागेवर लोकांना व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देत कथित वसुली केल्याचा आरोप आहे.
हा आरोप खरा असल्यास महापालिकेच्या मालकीच्या जागांचा वापर खासगी आर्थिक फायद्यासाठी होत असल्याचा गंभीर प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे गंगाधाम परिसरापुरती कारवाई मर्यादित न ठेवता सातारा रस्त्यावरील ट्रक टर्मिनससह महापालिकेच्या इतर मालमत्तांवरील अतिक्रमणे आणि त्यामागील आर्थिक व्यवहारांचीही चौकशी होणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.
केवळ पथारीवाल्यांवर कारवाई नको; अतिक्रमणांना संरक्षण देणाऱ्यांचीही चौकशी करा!
शहरातील रस्ते आणि सार्वजनिक जागा अतिक्रमणमुक्त ठेवणे, वाहतुकीतील अडथळे दूर करणे आणि नागरिकांना सुरक्षितपणे ये-जा करता यावी, हा महापालिकेच्या मोहिमेचा उद्देश आहे. मात्र, अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करताना त्यांना जागा उपलब्ध करून देणारे, कथित भाडेवसुली करणारे आणि अशा प्रकारांना संरक्षण देणारे घटकही तपासाच्या कक्षेत येणे आवश्यक आहे.
महापालिकेच्या जागा या सार्वजनिक मालमत्ता आहेत. त्यांचा वापर खासगी फायद्यासाठी होत असल्याच्या तक्रारी असतील, तर प्रशासनाने त्याची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करणे गरजेचे आहे. केवळ पथारीवाल्यांचे अतिक्रमण हटवून प्रश्न सुटणार नाही, तर त्यामागील कथित राजकीय आणि आर्थिक साखळीही उघड होणे आवश्यक आहे.
आयुक्त नवल किशोर राम यांच्या निर्देशानंतर अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी स्वतः मैदानात उतरून कारवाईची पाहणी केल्याने प्रशासनाची भूमिका आता अधिक कठोर होत असल्याचे दिसत आहे. मात्र, ही मोहीम केवळ काही दिवसांपुरती मर्यादित न राहता संपूर्ण शहरात सातत्याने राबवली जाणार का? तसेच महापालिकेच्या जागांचा गैरवापर करून कथित वसुली करणाऱ्यांवरही कारवाई होणार का? याकडे आता पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

