४९८ कोटींची थकबाकी; ७८ कोटी रुपयांचे व्याज व विलंब आकार होणार माफ
मुख्य अभियंता पंकज तगलपल्लेवार यांचे लाभ घेण्याचे आवाहन
पुणे, दि. १६ नोव्हेंबर २०२६ : कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे थकबाकीच्या ओझ्याखाली असलेल्या पुणे परिमंडलातील तब्बल २ लाख ८२ हजार ९७७ वीजग्राहकांना महावितरणच्या ‘अभय योजना २०२६-२७’मधून थकबाकीमुक्त होण्याची आणि पुन्हा वीजजोडणी घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या ग्राहकांकडे सुमारे ४९८ कोटी रुपयांची थकबाकी असून, योजनेत सहभागी झाल्यास त्यावरील सुमारे ७८ कोटी रुपयांचे व्याज व विलंब आकार पूर्णपणे माफ होणार आहेत. याशिवाय, मूळ थकबाकीच्या एकरकमी भरण्यावर २० टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार असल्याने ग्राहकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
महावितरणने ही योजना ६ नोव्हेंबर २०२६ ते १५ जानेवारी २०२७ या कालावधीत लागू केली आहे. पुणे परिमंडलातील गणेशखिंड, रास्तापेठ आणि पुणे ग्रामीण या तीन मंडलांमधील पात्र ग्राहकांना योजनेचा लाभ घेता येणार आहे. यामध्ये २१२ उच्चदाब ग्राहकांकडे सुमारे ७२.०६ कोटी रुपये, तर २ लाख ८२ हजार ७६५ लघुदाब व लघुदाब औद्योगिक ग्राहकांकडे सुमारे ४२५.९५ कोटी रुपये थकीत आहेत.
या योजनेअंतर्गत पात्र ग्राहकांच्या थकबाकीवरील १०० टक्के विलंब आकार आणि व्याज पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे. तसेच, तात्पुरता वीजपुरवठा खंडित झाल्यापासून कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित होईपर्यंतच्या कालावधीतील मागणी आकार (Demand Charges) आणि स्थिर आकार (Fixed Charges) माफ करण्यात येणार आहेत. मूळ थकबाकीच्या कालावधीनुसार ग्राहकांना १० ते २० टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार आहे. या विशेष सवलतीचा लाभ घेण्यासाठी संपूर्ण देय मूळ थकबाकीचा एकरकमी भरणा १५ डिसेंबर २०२६ पर्यंत करणे आवश्यक आहे. यालाच ‘अर्ली बर्ड इन्सेंटिव्ह’ असे संबोधण्यात आले आहे. मात्र, हप्त्यांमध्ये भरणा करणाऱ्या ग्राहकांना मूळ थकबाकीवरील ही सवलत मिळणार नाही.
एकरकमी भरणा करणे शक्य नसलेल्या ग्राहकांसाठी व्याजमुक्त हप्त्यांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. लघुदाब ग्राहकांना मूळ थकबाकीच्या किमान ५० टक्के रकमेचा भरणा करावा लागेल. उर्वरित रक्कम सहा समान व सलग मासिक हप्त्यांमध्ये भरता येईल. उच्चदाब ग्राहकांना थकबाकी ५० लाख रुपयांपर्यंत असल्यास उर्वरित रक्कम कमाल तीन मासिक हप्त्यांत, तर ५० लाख रुपयांपेक्षा अधिक असल्यास कमाल सहा मासिक हप्त्यांत भरता येईल. हप्त्यांच्या मंजूर कालावधीत विलंब आकार आकारला जाणार नाही. मात्र, हप्ते निर्धारित मुदतीत भरणे आवश्यक आहे.
विशेष म्हणजे, २० किलोवॅटपर्यंत जोडभार असलेल्या पात्र ग्राहकांनी पुनर्जोडणीच्या वेळी प्रीपेड स्मार्ट मीटर स्वीकारल्यास देय मूळ थकबाकीवर आणखी पाच टक्के अतिरिक्त सवलत मिळणार आहे. ही सवलत पुनर्जोडणीनंतर ग्राहकाच्या प्रीपेड मीटर खात्यात जमा करण्यात येईल. योजनेअंतर्गत उच्चदाब व लघुदाब ग्राहकांचे पुनर्जोडणी शुल्क, तसेच लघुदाब ग्राहकांचे सेवा जोडणी शुल्क पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ग्राहकांना महावितरणच्या ऑनलाइन पोर्टल किंवा मोबाईल ॲपद्वारे आवश्यक हमीपत्र व कागदपत्रांसह अर्ज करता येणार आहे. कोणताही वाद, न्यायालयीन प्रकरण किंवा बिलिंग तक्रार प्रलंबित असलेल्या ग्राहकांना संबंधित प्रकरण बिनशर्त मागे घेतल्यानंतर योजनेचा लाभ घेता येईल.
पुणे परिमंडलातील पात्र ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेऊन आपली थकबाकी निकाली काढावी आणि पुन्हा वीजजोडणी घेऊन वीजपुरवठा सुरू करून घ्यावा. विशेषतः २० टक्क्यांपर्यंतच्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी १५ डिसेंबरपूर्वी एकरकमी भरणा करावा. योजनेची अंतिम मुदत १५ जानेवारी २०२७ असल्याने ग्राहकांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर सहभागी व्हावे, असे आवाहन पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता पंकज तगलपल्लेवार यांनी केले आहे.
१५ डिसेंबरपर्यंत भरणा करा, मिळवा २० टक्क्यांपर्यंत सवलत!
महावितरणच्या अभय योजनेत पात्र ग्राहकांना मूळ थकबाकीच्या कालावधीनुसार १० ते २० टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार आहे. या विशेष ‘अर्ली बर्ड इन्सेंटिव्ह’चा लाभ घेण्यासाठी संपूर्ण देय मूळ थकबाकीचा एकरकमी भरणा १५ डिसेंबर २०२६ पर्यंत करणे आवश्यक आहे.
थकबाकीमुक्त होऊन पुन्हा वीजजोडणी घ्या– मुख्य अभियंता पंकज तगलपल्लेवार
“अभय योजना ही थकबाकीच्या ओझ्यातून मुक्त होण्याची आणि पुन्हा वीजजोडणी घेण्याची महत्त्वपूर्ण संधी आहे. थकबाकीवरील १०० टक्के व्याज व विलंब आकार माफ होणार असून, मूळ थकबाकीवरही २० टक्क्यांपर्यंत सवलत उपलब्ध आहे. एकरकमी भरणा शक्य नसलेल्या ग्राहकांसाठी व्याजमुक्त हप्त्यांची सुविधाही देण्यात आली आहे. त्यामुळे पुणे परिमंडलातील सर्व पात्र ग्राहकांनी या योजनेत सहभागी होऊन आपली थकबाकी निकाली काढावी.”

