चित्रपटाचा विषय ऐतिहासिक असेल, तर त्या विषयीच्या गप्पाही इतिहासाच्या साक्षीने व्हायला हव्यात! याच वेगळ्या विचारातून लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या आगामी ‘दर्याभवानी’ चित्रपटाच्या टीमने माध्यम प्रतिनिधींना थेट रत्नागिरीत आमंत्रित करत एका अनोख्या मीडिया संवादाचे आयोजन केले. ‘दर्याभवानी’ची निर्मिती श्री तिरुपती बालाजी चित्रचे प्रकाश पाटील, डॉ. अशोक जिवतोडे आणि एलेवेट फिल्म्सचे पवन सादमवार व सुरज सादमवार यांनी केली असून डॉ. मिलिंद भुसारी, अजिंक्य प्रकाश पाटील, पुष्कर यावलकर हे सहनिर्माते आहेत.
कोकणच्या निसर्गरम्य किनारपट्टीवर वसलेल्या ऐतिहासिक पूर्णगड किल्ल्यावर लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या आगामी ‘दर्याभवानी’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे दूरदर्शी सागरी धोरण आणि मराठी आरमाराचा पराक्रम हा या चित्रपटाचा महत्त्वपूर्ण भाग असून, त्याचे चित्रीकरण पूर्णगडच्या ऐतिहासिक आणि निसर्गरम्य परिसरात करण्यात येत आहे. अथांग समुद्राला साक्षी ठेवत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या अभिजीत श्वेतचंद्र यांच्या हस्ते समुद्राला श्रीफळ अर्पण करून चित्रीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून कोकणात या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असून, समुद्र, किल्ला आणि इतिहासाचा अनोखा संगम ‘दर्याभवानी’च्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे.
दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रत्येक कार्य, प्रत्येक मोहीम आणि त्यामागील विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचले पाहिजेत. याच उद्देशाने आम्ही सर्वांनी मिळून श्री शिवराज अष्टकाचा संकल्प केला.” आठ चित्रपटांच्या या महत्त्वाकांक्षी संकल्पातील ‘दर्याभवानी’ हा सातवा चित्रपट असून, अष्टकपूर्तीच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली, ‘दर्याभवानी’मध्ये नामवंत कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे. आऊसाहेबांच्या भूमिकेत मृणाल कुलकर्णी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अभिजीत श्वेतचंद्र, तर तानाजी मालुसरे यांच्या भूमिकेत अजय पुरकर दिसणार आहेत. याशिवाय योगिनीच्या भूमिकेत स्मिता शेवाळे, नंदाच्या भूमिकेत मृण्मयी देशपांडे, बाजी सर्जेराव यांच्या भूमिकेत आस्ताद काळे, किसनाच्या भूमिकेत निखिल राऊत, खेमनाकच्या भूमिकेत विराजस कुलकर्णी, हिरोजी इंदुलकर यांच्या भूमिकेत सचिन देशपांडे, मायनाक भंडारी यांच्या भूमिकेत ऋषी सक्सेना आणि दर्यासारंग यांच्या भूमिकेत इंद्रनील कामत असे अनेक प्रतिभावान कलाकार या चित्रपटातून ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहेत.
‘दर्याभवानी’ हा चित्रपट केवळ एक ऐतिहासिक कलाकृती नसून मराठी इतिहासातील एका महत्त्वपूर्ण पर्वाला मोठ्या पडद्यावर उजाळा देणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. चित्रपटाचा विषय, त्यासाठी निवडलेली भूमी आणि त्यातून निर्माण झालेला ऐतिहासिक माहोल यामुळे ही भेट केवळ प्रमोशनल इव्हेंट न राहता एक खास अनुभव ठरली. समुद्राच्या लाटांप्रमाणेच शिवरायांच्या सागरी पराक्रमाच्या आठवणींनाही या संवादातून उजाळा मिळाला. शिवरायांचे सागरी स्वप्न, मराठी आरमाराचा अभिमान आणि इतिहासातील पराक्रमाची प्रेरणादायी गाथा मोठ्या पडद्यावर अनुभवण्यासाठी प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

