पुणे, दि. १३ नोव्हेंबर २०२६ : महावितरणच्या पुणे परिमंडलाच्या मुख्य अभियंतापदी पंकज सुभाष तगलपल्लेवार गुरुवारी (दि. १२) रुजू झाले. त्यांनी प्रभारी मुख्य अभियंता ज्ञानदेव पडळकर यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारली.
पुणे परिमंडलाचे तत्कालीन मुख्य अभियंता सुनील काकडे यांची कार्यकारी संचालकपदी नियुक्ती झाल्यानंतर हे पद रिक्त होते. त्यामुळे रास्तापेठ शहर मंडलाचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांच्याकडे मुख्य अभियंतापदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. दरम्यान, पडळकर यांना मुख्य अभियंतापदी पदोन्नती मिळाल्याने ते गुरुवारी सायंकाळी कार्यमुक्त झाले.
तगलपल्लेवार हे यापूर्वी महावितरणच्या मुंबई येथील मुख्यालयात विशेष प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता म्हणून कार्यरत होते. तेथून प्रशासकीय बदलीने त्यांची पुणे परिमंडलात नियुक्ती झाली आहे. यापूर्वी त्यांनी पुण्यातील गणेशखिंड मंडलाचे अधीक्षक अभियंता म्हणून काम पाहिले आहे. त्यामुळे पुणे शहर आणि परिसरातील वीज वितरण व्यवस्थेची त्यांना चांगली जाण आहे. याशिवाय त्यांनी महाऊर्जाचे अतिरिक्त महासंचालक म्हणूनही काम केले आहे.
रास्तापेठ शहर मंडलाच्या अधीक्षक अभियंतापदी अशोक जाधव
ज्ञानदेव पडळकर यांना पदोन्नती मिळाल्याने रिक्त झालेल्या रास्तापेठ शहर मंडलाच्या अधीक्षक अभियंतापदी अशोक जाधव यांची पदोन्नतीने नियुक्ती झाली आहे. त्यांनी गुरुवारी दुपारी पडळकर यांच्याकडून पदभार स्वीकारला.

