पुणे- महाराष्ट्राची राजधानी मुंबईसह पुण्यात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणारे ई-मेल प्राप्त झाल्याने दोन्ही शहरांतील सुरक्षा यंत्रणांची धावपळ उडाली आहे. मुंबईतील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचा दावा या ई-मेलमध्ये करण्यात आला आहे. यामध्ये बँका, न्यायालये, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, महालक्ष्मी रेसकोर्स, सीएसएमटी बस स्थानक, मुंबईच्या महापौरांचे कार्यालय तसेच प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याचा समावेश आहे. मुंबईतील धमकीनंतर पुणे महापालिकेलाही बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा ई-मेल मिळाल्याने प्रशासन अधिक सतर्क झाले आहे.
दोन्ही शहरांमध्ये धमकीचे ई-मेल प्राप्त होताच पोलिसांसह सुरक्षा यंत्रणांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. संबंधित ठिकाणी बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाला पाचारण करण्यात आले. परिसराची तपासणी करून सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे.
मुंबई महापालिकेच्या महापौर कार्यालयाचाही ई-मेलमध्ये उल्लेख
मुंबईला आलेल्या धमकीच्या ई-मेलमध्ये मुंबई महापालिकेच्या इमारतीचाही उल्लेख करण्यात आला होता. विशेषतः महापौर कार्यालयाला लक्ष्य करण्याची धमकी दिल्याने महापालिका प्रशासनाने तातडीने सुरक्षा यंत्रणांना सतर्क केले. त्यानंतर बॉम्ब शोधक आणि नाशक पथक महापालिका मुख्यालयात दाखल झाले.
पथकाने संपूर्ण महापालिका परिसराची कसून तपासणी केली. महापौर कार्यालयात विशेष लक्ष देऊन विविध तपासणी यंत्रांच्या साहाय्याने पाहणी करण्यात आली. मात्र, या तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. त्यामुळे तूर्तास प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला असला, तरी सुरक्षेच्या दृष्टीने दक्षता कायम ठेवण्यात आली आहे.
बँका, विमानतळ आणि अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यालाही धमकी
धमकीच्या ई-मेलमध्ये मुंबईतील केवळ सरकारी कार्यालयांचाच नव्हे, तर सार्वजनिक आणि महत्त्वाच्या खासगी ठिकाणांचाही उल्लेख करण्यात आला आहे. शहरातील बँका, न्यायालये, महालक्ष्मी रेसकोर्स, सीएसएमटी बस स्थानक आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देण्यात आली आहे. याशिवाय अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याचाही उल्लेख असल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.
धमकी मिळालेल्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणांकडून आवश्यक ती तपासणी केली जात आहे. अद्याप मुंबईतील तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू सापडल्याची माहिती समोर आलेली नाही.
पुणे महापालिकेलाही धमकीचा ई-मेल
मुंबईतील धमकीची घटना ताजी असतानाच पुणे महापालिकेलाही बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल प्राप्त झाला. त्यामुळे पुणे महापालिका प्रशासनातही खळबळ उडाली. ई-मेल मिळाल्यानंतर बॉम्ब शोधक आणि नाशक पथक तातडीने महापालिका परिसरात दाखल झाले. संपूर्ण परिसराची बारकाईने तपासणी करण्यात येत आहे. प्राथमिक तपासणीत अद्याप कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नसल्याची माहिती आहे.
धमकीचे ई-मेल पाठवणारा कोण? पोलिसांकडून तपास सुरू
गेल्या काही दिवसांपासून देशातील विविध महत्त्वाच्या ठिकाणांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या ई-मेलद्वारे दिल्या जात आहेत. यापूर्वी देशभरातील विविध न्यायालयांनाही अशाच प्रकारचे धमकीचे ई-मेल प्राप्त झाले होते. त्यामुळे वारंवार अशा धमक्या दिल्या जाण्याच्या घटनांमुळे सुरक्षा यंत्रणांसमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे.
दरम्यान, मुंबई आणि पुण्यात धमकीचे ई-मेल नेमके कोणी पाठवले, त्यामागचा उद्देश काय होता आणि या धमक्यांमध्ये काही साम्य आहे का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. महाराष्ट्र सायबर विभागही ई-मेलच्या तांत्रिक तपासणीसाठी सक्रिय झाला आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.
धमकी खोटी असली तरी अशा प्रकारच्या ई-मेलमुळे सार्वजनिक ठिकाणी भीतीचे वातावरण निर्माण होते. तसेच सुरक्षा यंत्रणांना मोठ्या प्रमाणावर तपासणी करावी लागते. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करून धमकी देणाऱ्यापर्यंत पोहोचणे पोलिसांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

