पुणे : धर्मवीरगड, तिकोना गड, लाल महाल आणि सपिंडेश्वर मंदिर या चार ऐतिहासिक वास्तूंवर दीपावली पर्वानिमित्ताने दीपोत्सव करण्यात आला.
श्री शिवदुर्ग संवर्धन प्रतिष्ठानच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुयोग मित्र मंडळ, सह्याद्रीची भूते आणि महाराजा प्रतिष्ठान यांचे सहकार्य मिळाले.
अहिल्यानगर जिल्ह्यातील धर्मवीरगड हा छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाशी संबंधित किल्ला आहे. मावळातील तिकोना गड छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात सामील केला होता. लाल महालात राजमाता जिजाऊ आणि बालशिवाजी महाराजांचे वास्तव्य होते. तर कसबा पेठेतील सपिंडेश्वर मंदिराला प्राचीन धार्मिक वारसा लाभला आहे.
या ऐतिहासिक स्थळांचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविणे आणि त्यांच्या जतनाबाबत जनजागृती करणे, हा उपक्रमाचा उद्देश होता असे संयोजक मुकेश पवार यांनी सांगितले.
मुकेश पवार, महेंद्र पवार, सचिन दगडे, उमेश शेलार, ज्योती देशपांडे, सुनील मानकर आणि राजकुमार पाटील यांनी संयोजन केले.

