शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनात २५० हून अधिक ऐतिहासिक शस्त्रे
पुणे: शस्त्रांची माहिती आपण वाचतो, ऐकतो परंतु ते शस्त्र प्रत्यक्ष पाहण्यासाठी दुर्मिळ असतात. छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे मावळे यांचा इतिहास प्रेरणा देतातच सोबतच पराक्रमाने गाजलेले हे शस्त्र देखील आपल्याला बळ देतात त्यामुळे दिवाळीच्या निमित्ताने शिवसेना, शिव कामगार सेनेचे शस्त्रांचे हे प्रदर्शन पुणेकरांना शौर्याची पर्वणी आहे असे प्रतिपादन आमदार नीलम गोऱ्हे यांनी केले. अशा दुर्मिळ शस्त्रांच्या प्रदर्शनासाठी कायमस्वरूपी जागा महानगरपालिकेच्या वतीने उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू. सोबतच येत्या काळात हे प्रदर्शन मुंबई मंत्रालयाच्या परिसरात आयोजित करू असे देखील गोऱ्हे यांनी नमूद केले.
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये पुणेकरांसह शालेय विद्यार्थ्यांना शिवकालीन इतिहास आणि शौर्यपरंपरेची ओळख व्हावी, या उद्देशाने शिव कामगार सेनेच्या वतीने सारसबाग येथील स्व. बाळासाहेब ठाकरे कलादालनात शिवकालीन शस्त्रांचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाला आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज सोमवारी भेट दिली. यावेळी त्या बोलत होत्या. प्रसंगी राष्ट्रीय वेटलिफ्टिंग मध्ये नुकतेच सुवर्णपदक मिळवलेल्या ईशान्य कुमारी राऊत, शस्त्रांचे जतन करते हेमंत तिरळे, शिवगर्जना आखाडाचे महेश पारशिवनिकर, लाठीकाठी खेळाडू काव्या जगदाळे यांचा सन्मान यांच्या हस्ते करण्यात आला.
शिवगर्जना मर्दानी आखाड्याच्या या प्रदर्शनात भाला, तोफ, तलवार, वाघनखे, चिलखत, कट्यार, सांग, ढाल, बारुददान, दांडपट्टा, शमशेर, बिचवा आदी २५० हून अधिक विविध प्रकारची ऐतिहासिक शस्त्रे पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. हे प्रदर्शन ११ नोव्हेंबरपर्यंत दररोज सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. नागरिकांनी तसेच शालेय विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन आयोजक सुधीर कुरूमकर यांनी केले.
दिवाळीनिमित्त शिव कामगार सेनेच्या वतीने ५ ते ११ नोव्हेंबरदरम्यान पुणेकरांसाठी विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिव कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष सुधीर कुरूमकर यांच्या पुढाकारातून सारसबाग येथील शिवसेना भवन आणि बाळासाहेब ठाकरे कलादालन येथे हे उपक्रम राबविण्यात येत आहेत.
उद्या दिवाळी पाडवा निमित्ताने १००८ दिव्यांचा दीपोत्सव सारसबाग येथील महालक्ष्मी मंदिराच्या परिसरात आयोजित करण्यात येणार आहे.

