पायल झांबरे यांच्या माहेरी जाऊन डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट; न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा करण्याची ग्वाही
विशेष सरकारी वकील नियुक्त करण्याची मागणी; पायल यांच्या चिमुकलीचा ताबा माहेरच्या कुटुंबीयांना मिळवून देण्यासाठी कायदेशीर प्रयत्न करणार
पुणे, दि. ७ नोव्हेंबर २०२६ : “प्रत्येक दिवाळीत हुंड्यासाठी छळ झालेल्या मुलींच्या मृत्यूच्या घटना समोर येणे ही अत्यंत वेदनादायी बाब आहे. लक्ष्मीपूजन करताना माझी एकच प्रार्थना असते की, महाराष्ट्रात एकही मुलगी हुंड्याची बळी ठरू नये. ज्या दिवाळीत एकही हुंडाबळी घडणार नाही, तीच माझ्यासाठी खरी दिवाळी असेल,” अशा भावनिक शब्दांत शिवसेना नेत्या, महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सदस्या तथा माजी उपसभापती आणि स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूर परिसरातील श्रीरामनगर येथे पायल झांबरे यांच्या माहेरी जाऊन डॉ. गोऱ्हे यांनी पवार कुटुंबीयांची भेट घेतली. पायल यांच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त करत त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन केले आणि संपूर्ण घटनेची माहिती घेतली. या प्रकरणात न्याय मिळेपर्यंत कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, महिला आघाडी संपर्कप्रमुख कांता पांढरे, युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारे, स्त्री आधार केंद्र संस्थेच्या अनिता शिंदे, आश्लेषा खंडागळे, मेघना गिडनावर आदी उपस्थित होते.
पायल यांच्या मृत्यूमागे हुंड्यासाठी छळ, मानसिक त्रास आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे गंभीर आरोप आहेत. या प्रकरणातील शवविच्छेदन अहवाल, मोबाईल संभाषणे, आर्थिक व्यवहार आणि इतर सर्व पुरावे तपासून सखोल चौकशी करण्यात यावी. तपासाच्या आवश्यकतेनुसार आरोपींच्या पोलीस कोठडीबाबत न्यायालयात योग्य भूमिका मांडावी. तसेच दोषींना कठोर शिक्षा मिळण्यासाठी अनुभवी विशेष सरकारी वकील नियुक्त करावा, अशी मागणी डॉ. गोऱ्हे यांनी केली.
पायल यांच्या चिमुकलीचा ताबा माहेरच्या कुटुंबीयांना मिळावा
पायल यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या लहान मुलीच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. महिला व बालविकास विभागाने तातडीने लक्ष घालून बालिकेच्या सर्वोत्तम हिताचा विचार करत तिचा ताबा माहेरच्या कुटुंबीयांना मिळण्यासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया राबवावी, अशी मागणी त्यांनी केली.
“मी स्वतः एक आई आणि आजी आहे. त्या चिमुकलीला पाहून माझेही डोळे पाणावले. तिच्या आईला आपण परत आणू शकत नाही; मात्र तिचे भविष्य सुरक्षित ठेवणे ही आपली जबाबदारी आहे,” असे त्या म्हणाल्या.
या प्रकरणाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना दिली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मृतदेह आढळल्यानंतर रुग्णवाहिका उपलब्ध होण्यास किंवा अन्य कार्यवाहीत कथित दिरंगाई झाली असल्यास त्याची चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे स्पष्ट केले.
हुंडाबळीच्या आरोपींना जामीन देताना पीडित कुटुंबाच्या सुरक्षिततेचा विचार व्हावा
वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपींना मिळालेल्या जामिनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. गोऱ्हे यांनी चिंता व्यक्त केली. संबंधित न्यायालयीन आदेश तपासून कायदेशीर आधार असल्यास जामीन रद्द करण्यासाठी शासनाने सक्षम न्यायालयात अर्ज करावा, अशी मागणी त्यांनी केली.
“हुंडाबळी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या प्रकरणांमध्ये आरोपींना जामीन मिळाल्यानंतर पीडित कुटुंबीयांचे मनोधैर्य खचते. साक्षीदारांवर दबाव येण्याची शक्यता आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेचाही विचार झाला पाहिजे,” असे त्यांनी सांगितले.
मुलगी म्हणजे एटीएम नाही; हुंड्यासाठी छळ करणारी प्रवृत्ती थांबली पाहिजे
मुलीच्या माहेरच्या संपत्तीवर डोळा ठेवून तिच्यावर पैसे आणि मालमत्तेसाठी दबाव आणणे ही गंभीर सामाजिक विकृती आहे. “लग्न झालेली मुलगी म्हणजे एटीएम नाही. दुसऱ्याच्या कष्टाची संपत्ती ओरबाडून घेऊन कधीही लक्ष्मी प्रसन्न होत नाही,” असे डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.
छळ होत असलेल्या मुलींना पुन्हा सासरी जाण्यासाठी दबाव टाकण्याऐवजी त्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले पाहिजे. आई-वडील, बहिणी आणि मैत्रिणींनी मुलींशी विश्वासाने संवाद साधून त्यांच्या पाठीशी उभे राहावे. तसेच लग्नसमारंभांमध्ये केवळ नववधूलाच नव्हे, तर जावयालाही पत्नीचा सन्मान करण्याची शिकवण दिली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
न्यायालयीन पाठपुराव्यासाठी महिलांची समिती स्थापन करा
पायल झांबरे प्रकरणात न्याय मिळेपर्यंत सातत्याने पाठपुरावा करण्यासाठी स्थानिक महिला आणि ग्रामस्थांनी २० ते २२ सदस्यांची समिती स्थापन करावी. न्यायालयीन सुनावणीच्या वेळी कुटुंबीयांना आधार देण्यासाठी समितीतील सदस्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले. स्त्री आधार केंद्राच्या कार्यकर्त्यांकडूनही आवश्यक मदत केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
पायल झांबरे प्रकरणासह वैष्णवी हगवणे आणि शिल्पा गवारे (कलाटे) प्रकरणांतील तपास व न्यायालयीन प्रक्रियेची माहिती घेऊन महिलांवरील अत्याचार, हुंडाबळी आणि पीडित कुटुंबांच्या सुरक्षिततेचे प्रश्न डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनात उपस्थित करणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.
“एका मुलीचा जीव गेल्यानंतर तिच्या कुटुंबाला न्याय मिळवून देणे महत्त्वाचे आहेच; मात्र भविष्यात एकाही मुलीवर अशी वेळ येऊ नये, यासाठी समाजाने एकत्रितपणे पुढाकार घेतला पाहिजे,” असे आवाहन करत डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पवार कुटुंबीयांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

