पुण्यातील डॉ. नंदकिशोर कपोते कल्चरल सोसायटीचा पुढाकार; स्वामी रामदेव बाबा यांच्या हस्ते कथक नर्तक डॉ. कपोते यांचाही गौरव
पुणे : हरिद्वार येथे २९ ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत पार पडलेल्या ५२ व्या अखिल भारतीय प्राच्यविद्या संमेलनात पुण्यातील डॉ. नंदकिशोर कपोते कल्चरल सोसायटीच्या वतीने ‘विमल भास्कर’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारतीय ललित कला विभागातील सर्वोत्कृष्ट सादरीकरणासाठी तिरुपती येथील गोपीनामबाला व्यंकट कुलसेखर यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्वामी रामदेव बाबा यांच्या हस्ते हा पहिला पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या संमेलनाचे आयोजन हरिद्वार येथील पतंजली विद्यापीठाच्या वतीने करण्यात आले होते. भारतीय प्राच्यविद्या, संस्कृत अध्ययन, कला आणि सांस्कृतिक परंपरेच्या अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या या संमेलनात विविध क्षेत्रांतील अभ्यासक आणि मान्यवर सहभागी झाले होते.
डॉ. नंदकिशोर कपोते कल्चरल सोसायटीच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेला ‘विमल भास्कर’ पुरस्कार यापुढील अखिल भारतीय प्राच्यविद्या संमेलनांमध्ये कायमस्वरूपी प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. कपोते यांनी दिली.
या प्रसंगी आचार्य बालकृष्ण, पतंजली विद्यापीठाचे कुलगुरू, रत्नागिरी येथील भारतरत्न पां. वा. काणे संस्कृत अध्ययन केंद्राचे संचालक प्रा. दिनकर मराठे, पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे सहसचिव डॉ. श्रीनंद बापट यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कथक नर्तक डॉ. नंदकिशोर कपोते यांचाही सन्मान
संमेलनादरम्यान प्रख्यात कथक नर्तक डॉ. नंदकिशोर कपोते यांचा स्वामी रामदेव बाबा यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. भारतीय शास्त्रीय नृत्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची यानिमित्ताने दखल घेण्यात आली.
अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषदेची स्थापना १९१८ मध्ये पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या पुढाकारातून झाली होती. या ऐतिहासिक परंपरेतील ५२ वे संमेलन यंदा हरिद्वार येथे पार पडले.
पुण्यातील संस्थेच्या वतीने भारतीय ललित कला क्षेत्रातील उत्कृष्ट सादरीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘विमल भास्कर’ पुरस्कारामुळे या संमेलनाच्या सांस्कृतिक उपक्रमांना नवी जोड मिळाली आहे.

