सर्व्हे क्र. ११३/१ आणि ११३/२ मधील कामाच्या परवानग्यांवर प्रश्नचिन्ह; ‘माय मराठी’ची प्रत्यक्ष स्थळपाहणी, महापालिका व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या खुलाशाची गरज
टेकडीच्या तीव्र उतारावर दिसणारे काम, त्याच्या परवानग्या, रहिवाशांना होणारा त्रास आणि पर्यावरणीय सुरक्षितता या सार्वजनिक हिताच्या प्रश्नांची अधिकृत पडताळणी होणे गरजेचे
पुणे, दि. १ नोव्हेंबर २०२६ :
कोथरूडमधील सुतारदरा परिसरात टेकडीच्या तीव्र उतारावरील एका मोठ्या खासगी भूखंडात जेसीबीसारख्या यंत्रसामग्रीचा वापर होत असल्याचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर समोर आले आहेत. या भूखंडावर नेमके कोणते काम केले जात आहे, त्यासाठी कोणत्या विभागांकडून परवानग्या घेण्यात आल्या आहेत आणि टेकडीच्या नैसर्गिक उतारात बदल करण्यात येत आहे का, असे गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
संबंधित भूखंड सुतारदरा, कोथरूड येथील सर्व्हे क्रमांक ११३/१ आणि ११३/२ मधील असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर ‘माय मराठी’ने रविवारी, १ नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष परिसरात जाऊन पाहणी केली.
तीव्र उतारावर पत्र्याचे कुंपण; आत प्रवेशास मनाई
प्रत्यक्ष पाहणीदरम्यान संबंधित परिसरात तीव्र चढ असल्याचे आढळले. हा उतार डोंगराच्या माथ्यापर्यंत जात असून भूखंडाच्या बाजूने पत्र्याचे कुंपण उभारण्यात आले आहे.
परिसरात ‘खासगी जागा’ आणि ‘आत प्रवेशास मनाई’ अशा सूचना देणाऱ्या पाट्या लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे बाहेरून भूखंडाच्या आतील कामाचे स्वरूप स्पष्टपणे पाहता येत नाही.
मात्र माथ्यावरून करण्यात आलेल्या २१ सेकंदांच्या चित्रीकरणात काही भागांत उघडी पडलेली माती, जमिनीवर तयार झालेले मार्ग आणि खोदकामासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रसामग्रीसारखी वाहने दिसतात. या दृश्यांमधून कामाचे प्रमाण, स्वरूप आणि त्यासाठीच्या परवानग्या तपासण्याची गरज अधोरेखित होते.
कुंपणासाठी परवानगी असल्याचा दावा; मग यंत्रसामग्रीचा वापर कशासाठी?
स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित भूखंडाभोवती कुंपण घालण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून परवानगी मिळाल्याचे सांगण्यात येते.
मात्र या परवानगीचा आदेश, त्यातील अटी आणि मंजूर कामाचा तपशील अद्याप उपलब्ध झालेला नाही.
जर परवानगी केवळ कुंपण उभारण्यासाठी दिलेली असेल, तर जमिनीचे सपाटीकरण, उतार कापणे, माती किंवा मुरूम हलवणे अथवा अंतर्गत मार्ग तयार करण्यासाठी स्वतंत्र मंजुरी आवश्यक आहे का, याची अधिकृत तपासणी होणे गरजेचे आहे.
जमिनीच्या क्षेत्रफळाबाबतही पडताळणी आवश्यक
स्थानिकांनी संबंधित भूखंडाचे क्षेत्रफळ ३६ एकर २८ गुंठे असल्याचे सांगितले आहे. तथापि, सर्व्हे क्र. ११३/१ आणि ११३/२ यांचे अचूक क्षेत्रफळ, विद्यमान मालकी, भूखंडाची हद्द आणि जमीनवापराचे वर्गीकरण यांची महसूल अभिलेखातून पुष्टी होणे आवश्यक आहे.
जमिनीच्या जुन्या मालकीविषयीही विविध माहिती समोर येत असून, अधिकृत ७/१२ उतारे, फेरफार नोंदी आणि मोजणी नकाशा मिळाल्यानंतरच निश्चित निष्कर्ष काढता येईल.
संबंधित भूखंडाचा उल्लेख उच्च न्यायालयाच्या आदेशातही; जमीन व्यवहारांवरून यापूर्वी फौजदारी प्रकरण
विशेष म्हणजे, मुंबई उच्च न्यायालयाच्या १९ ऑक्टोबर २०२२ रोजीच्या आदेशात सुतारदरा, कोथरूड येथील सर्व्हे क्र. ११३/१ आणि ११३/२ या भूखंडांचा स्पष्ट उल्लेख आढळतो. या आदेशातील प्रकरणाच्या नोंदीनुसार, संबंधित जमिनीचे क्षेत्रफळ ३६ एकर ३७ गुंठे आहे. तसेच १९४७ मध्ये सेठ पंचन लब्धा सावळा आणि मगनभाई ईश्वरभाई पटेल यांच्याकडे जमीन हस्तांतरित झाल्याचा संदर्भ देण्यात आला आहे.
पुढे १९६५ मधील नोंदणीकृत विक्रीखताद्वारे ही जमीन मोहम्मद शफी शेख यांच्याकडे हस्तांतरित झाल्याचे आदेशात नोंदवलेल्या सरकारी पक्षाच्या माहितीत नमूद आहे. त्यांच्या निधनानंतर जमिनीच्या मालकीहक्कावरून वाद निर्माण झाला. जमिनीच्या व्यवहारांमध्ये बनावट कागदपत्रांचा वापर झाल्याच्या आरोपावरून कोथरूड पोलीस ठाण्यात २०२१ मध्ये गुन्हा क्रमांक ३२/२०२१ दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणातील काही आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळले होते. मात्र संबंधित न्यायालयीन आदेश हा अटकपूर्व जामिनासंदर्भातील असून त्यातून कोणत्याही व्यक्तीवरील गुन्हा अंतिमतः सिद्ध झालेला नाही. तसेच या जुन्या जमीनवादाचा सध्या भूखंडावर सुरू असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या कामाशी थेट संबंध असल्याची पुष्टी झालेली नाही.
त्यामुळे या भूखंडाची सध्याची कायदेशीर मालकी कोणाकडे आहे, प्रत्यक्ष काम कोणाच्या वतीने केले जात आहे, जमीन कोणत्या विकास नियंत्रण क्षेत्रात मोडते आणि कामासाठी कोणत्या शासकीय परवानग्या देण्यात आल्या आहेत, याबाबत महापालिका व महसूल प्रशासनाने अधिकृत कागदपत्रांच्या आधारे स्पष्ट माहिती देणे आवश्यक ठरते.
संदर्भ : मुंबई उच्च न्यायालयाचा १९ ऑक्टोबर २०२२ रोजीचा न्यायालयीन आदेश:सुतारदरा, कोथरूड येथील सर्व्हे क्र. ११३/१ आणि ११३/२ या जमिनीच्या व्यवहारांशी संबंधित प्रकरणाचा उल्लेख असलेला मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश वाचकांच्या माहितीसाठी उपलब्ध करून देत आहोत.न्यायालयीन आदेशाची प्रत : https://indiankanoon.org/doc/158108348/
रहिवाशांना आवाजाचा त्रास असल्याची माहिती
संबंधित भागातील यंत्रसामग्रीच्या आवाजामुळे त्रास होत असल्याचे काही स्थानिकांकडून सांगण्यात आले. मात्र जाहीरपणे बोलण्यास रहिवासी तयार नसल्याचे पाहणीदरम्यान जाणवले.
कामाच्या वेळा, वापरण्यात येणारी यंत्रे, आवाज आणि धूळ याबाबत प्रशासनाने तपासणी करावी, अशी गरज निर्माण झाली आहे.
हा वेताळ टेकडीचाच भाग आहे का?
समाजमाध्यमांवर प्रसारित झालेल्या व्हिडिओंमध्ये संबंधित भागाचा उल्लेख वेताळ टेकडी असा करण्यात आला आहे. तथापि, काही स्थानिकांनी संबंधित भूखंड आणि वेताळ टेकडी यांच्यामध्ये एआरएआयचा परिसर असल्याचे सांगितले.
त्यामुळे या भूखंडाचा वेताळ–एआरएआय टेकडी परिसराशी नेमका भौगोलिक संबंध काय आहे, तो हिल टॉप–हिल स्लोप क्षेत्रात येतो का आणि विकास आराखड्यात त्याचे कोणते वर्गीकरण आहे, हे पुणे महापालिकेने अधिकृत नकाशासह स्पष्ट करणे आवश्यक आहे.
समाज माध्यमावर व्हायरल लिंक https://www.facebook.com/share/v/1MZk2Rg8rj/
महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालय कोणती भूमिका घेणार?
संबंधित जमिनीवरील प्रत्यक्ष कामाचे स्वरूप, दिलेल्या परवानग्या आणि त्यातील अटी यांची तपासणी होणे आवश्यक आहे.
पुणे महापालिकेच्या बांधकाम परवानगी व नगररचना विभागाने, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाने संयुक्त स्थळपाहणी करून या कामाबाबत नागरिकांसमोर वस्तुस्थिती मांडावी.
खासगी भूखंडावर कुंपण उभारणे हा वेगळा विषय असला, तरी तीव्र उतारावर यंत्रसामग्रीच्या साहाय्याने केलेल्या कामाचा प्रकार आणि त्यासाठीच्या मंजुऱ्या हा सार्वजनिक हिताचा प्रश्न आहे.
माय मराठीचा सवाल : सुतारदऱ्यातील सर्व्हे क्र. ११३/१ व ११३/२ या भूखंडातील कामाच्या सर्व परवानग्या आणि मंजूर नकाशे पुणे महापालिका सार्वजनिक करणार का?
संपादकीय नोंद : स्थळपाहणीत दिसलेली परिस्थिती आणि स्थानिकांनी दिलेली माहिती यांवर हे वृत्त आधारित आहे. संबंधित काम बेकायदेशीर असल्याचा निष्कर्ष काढलेला नाही. जमीनधारक, संबंधित काम करणारी संस्था आणि प्रशासनाची अधिकृत भूमिका जर जाहीर करण्यात आली आणि ती प्रसिद्ध करण्यात येईल.
माय मराठी — महाराष्ट्राचा आवाज जगभर
www.mymarathi.net

