पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (PMPML) ने ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला असून, दि. १ नोव्हेंबर २०२६ पासून ६० वर्षे व त्यावरील नागरिकांना प्रवासभाड्यात ५० टक्के सवलत लागू करण्यात येणार आहे. ही सवलत पुणे, पिंपरी-चिंचवड शहर तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातील पीएमपीएमएलच्या बससेवेस लागू राहणार आहे.
पीएमपीएमएलच्या संचालक मंडळाच्या मान्यतेनंतर ही योजना लागू करण्यात येत असून, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना सार्वजनिक बससेवा अधिक सुलभ आणि परवडणाऱ्या दरात उपलब्ध होणार आहे.
यापूर्वी पीएमपीएमएलकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी दैनिक पास रु. ७० दराने उपलब्ध होता. त्यावर ५० टक्के सवलत देऊन रु. ३५ इतक्या दरात ज्येष्ठ नागरिक दैनिक पास योजना सुरू करण्यात आली होती. आता त्यासोबतच सर्व बसमार्गांवरील प्रवास तिकीटभाड्यातही ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या सवलतीचा लाभ घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी वयाचा पुरावा जवळ बाळगणे आवश्यक आहे. त्यासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड किंवा पीएमपीएमएलचे ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. तसेच आधारकार्डवर पूर्ण जन्मतारीख असणे अनिवार्य असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
या योजनेमुळे ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन प्रवासात आर्थिक दिलासा मिळणार असून, पीएमपीएमएलच्या सार्वजनिक वाहतूक सेवेला अधिक प्राधान्य मिळण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
पीएमपीएमएलने सर्व ज्येष्ठ नागरिकांनी या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

