पुणे, : वाल्हेकरवाडी येथे महादेव मंदिराजवळील उड्डाणपुलाच्या परिसरात अद्यात व्यक्तीने कचरा जाळण्यात आल्यामुळे आज (दि. २६ ऑक्टोबर) दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास TACO-1 आणि TACO-2 या उच्चदाब भूमिगत विद्युत वाहिन्यांच्या चालू व पर्यायी अशा दोन्ही २२ केव्ही इनकमर केबल जळाल्या. यामुळे २२/११ केव्ही बेंचमार्क उपकेंद्र आणि २२/११ केव्ही पेठकर उपकेंद्रांतून निघणाऱ्या ११ केव्ही उच्चदाब वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे.
या घटनेमुळे पुणे-मुंबई महामार्गाच्या पश्चिमेकडील ताथवडे आणि पुनावळे परिसरातील सुमारे १५ ते १६ हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे.
चालू वीजवाहिनीसोबतच पर्यायी वाहिनीची केबलही जळाल्यामुळे अन्य पर्यायी मार्गाने वीजपुरवठा सुरळीत करण्यावर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे बाधित वीजवाहिन्यांच्या केबल जोडण्यासह वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांकडून युद्धपातळीवर शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
ताथवडे आणि पुनावळे परिसरातील वीजग्राहकांनी वीजपुरवठा पूर्ववत होईपर्यंत संयम राखून महावितरणला सहकार्य करावे. केबल दुरुस्तीचे काम पूर्ण करून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.
वीजवाहिन्यांजवळ कचरा जाळू नका!
उच्चदाब भूमिगत वीजवाहिन्या, वीज केबल्स तसेच वीजयंत्रणेजवळ कचरा जाळल्यामुळे केबल्सचे नुकसान होऊन मोठ्या परिसरातील वीजपुरवठा खंडित होऊ शकतो. अशा घटनांमुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो, तसेच महावितरणच्या वीजयंत्रणेचे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी वीजवाहिन्या, भूमिगत केबल मार्ग आणि विद्युत यंत्रणेजवळ कचरा जाळू नये. कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावून महावितरणच्या वीजयंत्रणेची सुरक्षितता राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.

