स्त्रीवाद एकाच आवाजाचा नाही; स्त्रियांच्या विविध अनुभवांतून त्याची व्याप्ती उलगडते : रेखा इनामदार-साने
महिला लोकप्रतिनिधींना अभ्यासपूर्ण मांडणीची पुरेशी संधी हवी : डॉ. कांता नलावडे
पुणे, : स्त्रीवाद म्हणजे स्त्रीचा अधिकार. स्त्रीच्या अधिकारांचे हनन करणारी प्रवृत्ती स्त्रीची असो वा पुरुषाची, तिच्याविरुद्ध उभे राहणे आवश्यक आहे. महिलांनी आपले अनुभव, संघर्ष आणि विचार निर्भयपणे लिहावेत. अधिकारांचा आवाज मांडताना दबाव किंवा त्रास सहन करावा लागल्यास त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहीन, अशी ग्वाही विधान परिषद सदस्या तथा माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली.
महाराष्ट्र साहित्य परिषद आयोजित, समर्थ युवा फाउंडेशन, मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन आणि स्त्री आधार केंद्र यांच्या सहभागातून कर्वेनगर येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या के. बी. जोशी सभागृहात झालेल्या ‘स्त्रीवादी साहित्य संमेलनाच्या’ समारोप सत्रात त्या बोलत होत्या. संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ लेखिका डॉ. छाया महाजन, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह स्वाती महाळंक, ज्येष्ठ लेखिका व समीक्षक रेखा इनामदार-साने, माजी विधान परिषद सदस्या डॉ. कांता नलावडे यांच्यासह साहित्यिक, सामाजिक कार्यकर्त्या आणि साहित्यप्रेमी उपस्थित होते.
स्त्रियांच्या संघर्षात आपण सहप्रवासी : डॉ. गोऱ्हे
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, प्रत्येक स्त्रीच्या संघर्षामध्ये एका महाकादंबरीचे सामर्थ्य दडलेले आहे. तिला स्त्रीवादी होण्याचा उपदेश करण्यापेक्षा तिच्या वाटेवर सहप्रवासी होण्याची गरज आहे. स्त्रियांना निराश करण्याचे प्रयत्न सातत्याने होत असताना एकमेकींना आशा, उमेद आणि बळ देणारे व्यासपीठ म्हणून या संमेलनाकडे पाहिले पाहिजे.
स्त्रीवादाकडे केवळ पाश्चिमात्य विचार म्हणून पाहणे योग्य नसल्याचे सांगून त्या म्हणाल्या की, भारतीय स्त्रियांचे अधिकार आपल्या संविधानाशी आणि कायद्यांशी जोडलेले आहेत. कोणत्याही विचाराचे अंधानुकरण करण्याऐवजी आपल्या वास्तवातील दुजाभावाला प्रश्न विचारणे महत्त्वाचे आहे. स्त्रीवाद मांडताना सतत बचावात्मक भूमिका घेण्याची आवश्यकता नाही. अन्याय, अत्याचार आणि वर्चस्वाच्या प्रवृत्तींना स्पष्ट विरोध केला पाहिजे.
महिलांनी व्हॉट्सॲपवरील अभिव्यक्तीपलीकडे जाऊन लेख, समीक्षा, कथा आणि कविता लिहाव्यात. स्वतःच्या लेखनाचे परीक्षण करावे, इतरांचे ऐकावे आणि वाचन वाढवावे, असे आवाहन त्यांनी केले. दुःख आणि अपमानाच्या अनुभवांत अडकून न राहता नव्या उमेदीने पुढे जाण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
अनुभवांचे पुस्तक आणि डिजिटल कार्यशाळेचा संकल्प
संमेलनातील अनुभव व मनोगते पुस्तकाच्या स्वरूपात आणण्याची सूचना स्वीकारत असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. कार्यक्रमातील सत्रांचे पुनर्प्रसारण करण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला. आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात महिलांसाठी स्वतंत्र संवादाचा कट्टा किंवा व्यासपीठ उपलब्ध व्हावे, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
लेखिकांनी समाजमाध्यमांवर आपले साहित्य उपलब्ध करावे, एकमेकींशी जोडले जावे आणि ट्रोलिंगच्या प्रसंगी परस्परांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले. त्यासाठी डिजिटल कार्यशाळा घेण्याची कल्पनाही त्यांनी मांडली. संमेलनातील विचारांचे आपापल्या गावांत प्रत्यक्ष किंवा ऑनलाइन संवादातून आदानप्रदान करावे. तसेच दुष्काळामुळे संकटात सापडलेल्या कुटुंबांना शक्य ती मदत करावी, असेही त्या म्हणाल्या.
विविध अनुभवांतून स्त्रीवादाची व्याप्ती उलगडते : रेखा इनामदार-साने
रेखा इनामदार-साने यांनी ‘मी का लिहिते’ या सत्राचे विशेष कौतुक केले. विविध गावांतील आणि सामाजिक पार्श्वभूमीतील लेखिकांच्या मांडणीतून स्त्रीवाद एकरेषीय, एकदिशीय किंवा एकाच आवाजाचा नसल्याचे स्पष्ट झाले. ही केवळ आत्मकथने नसून त्यामागे व्यापक सामाजिक अनुभव आहेत. ही मनोगते लेखी स्वरूपात मागवून पुस्तिका किंवा पुस्तक प्रकाशित करावे, अशी सूचना त्यांनी केली.
पन्नाशीनंतरच्या महिलांची कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये होणारी ओढाताण त्यांनी अनुभवकथनातून मांडली. महिलांना शिक्षणासाठी, आवडींसाठी आणि स्वतःचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र अवकाश मिळायला हवा. स्वतःला काय हवे आहे, याचा विचार करून निवडीचे स्वातंत्र्य जाणीवपूर्वक वापरणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. सुखवस्तू महिलांनी वंचित महिलांच्या वास्तवाचेही भान ठेवावे, असे नमूद करत डॉ. गोऱ्हे यांनी पुन्हा कथालेखनाकडे वळावे, अशी मैत्रीपूर्ण अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
महिलांच्या अभ्यासपूर्ण भूमिकेला वाव मिळावा : डॉ. कांता नलावडे
डॉ. कांता नलावडे यांनी विधान परिषदेतील आपल्या कार्यकाळातील अनुभव मांडताना महिला आमदारांकडे विविध विषयांचा अभ्यास आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव असूनही त्यांना बोलण्याची संधी मिळण्यासाठी आग्रह धरावा लागत असल्याचे सांगितले. विधिमंडळातील चर्चेत महिलांच्या अभ्यासपूर्ण भूमिकेला पुरेसा वाव मिळाला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
स्थानिक स्वराज्य संस्थांतील महिला आता अधिक आत्मविश्वासाने प्रश्न मांडत असून स्वतंत्र नेतृत्व करत असल्याचे त्यांनी नमूद केले. डॉ. गोऱ्हे यांनी उपसभापतीपदाच्या कार्यकाळात महिला सदस्यांना बोलण्याची संधी दिल्याचे कौतुक करत, त्यांना सभापतीपदाची संधी मिळावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. समुपदेशन आणि सामाजिक कार्यातून आलेले अनुभव आपल्या ‘प्रतिबिंब’ कथासंग्रहात मांडल्याचे त्यांनी सांगितले.
समारोपात डॉ. गोऱ्हे यांनी मल्लिका अमरशेख आणि मंगला गोडबोले यांच्या उद्घाटन सत्रातील मांडणीचा गौरव केला. दिवसभरातील कवितांचे सादरीकरण आणि लेखिकांच्या अनुभवांनी समृद्ध वैचारिक शिदोरी दिल्याचे त्या म्हणाल्या. उत्तरा मोने, त्यांची सहकारी टीम, स्त्री आधार केंद्राचे कार्यकर्ते आणि उपस्थितांचे त्यांनी आभार मानले. नियोजित वेळेपलीकडे, सायंकाळी साडेसातपर्यंत श्रोत्यांनी उपस्थित राहून चर्चेला प्रतिसाद दिल्याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले.

