ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याची, कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची मागणी; संयुक्त बैठक बोलावण्याबाबत राज्यमंत्र्यांना निवेदन
पुणे, दि. १९ ऑक्टोबर : येरवडा येथील चित्रा चौक परिसरात ड्रेनेजच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिक श्री. प्रदीप लक्ष्मण परदेशी (वय ६९ वर्षे) यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना नेत्या, विधान परिषद सदस्या तथा माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. या प्रकरणी गृह (शहरे) राज्यमंत्री श्री. योगेश कदम आणि नगरविकास राज्यमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांची तातडीची संयुक्त बैठक बोलवावी, अशी मागणीही त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
शिवसेनेचे पुणे शहर संघटक श्री. आनंद गोयल यांनी दिलेल्या निवेदनानुसार, चित्रा चौक परिसरात पुणे महानगरपालिकेच्या मलनिःसारण विभागामार्फत मागील सहा महिन्यांपासून ड्रेनेजचे काम सुरू आहे. या कामासाठी खोदलेल्या सुमारे १० ते १५ फूट खोल खड्ड्यात दि. १७ ऑक्टोबर रोजी श्री. परदेशी पडले. गंभीर जखमी झाल्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
कामाच्या ठिकाणी मजबूत बॅरिकेड्स, धोक्याचे सूचना फलक, परावर्तक चिन्हे आणि पुरेशी प्रकाशव्यवस्था नव्हती. स्थानिक नागरिकांनी यापूर्वी तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे गोयल यांच्या निवेदनात नमूद आहे.
“सार्वजनिक कामे सुरू असताना नागरिकांच्या जीविताचे रक्षण करणे ही संबंधित यंत्रणा आणि ठेकेदाराची जबाबदारी आहे. या दुर्घटनेची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी. मृताच्या कुटुंबीयांना तातडीने आधार मिळावा आणि अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ठोस उपाययोजना व्हाव्यात,” अशी भूमिका डॉ. गोऱ्हे यांनी मांडली.
संबंधित ठेकेदार व अन्य जबाबदार व्यक्तींविरुद्ध लागू कायदेशीर तरतुदींनुसार गुन्हा नोंदविण्याची कार्यवाही करावी. तपासातील पुराव्यांच्या आधारे सदोष मनुष्यवधाच्या तरतुदी लागू होतात का, याचीही पडताळणी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच दोषी ठेकेदारास नियमानुसार काळ्या यादीत टाकावे आणि देखरेखीत हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर विभागीय कारवाई करावी, असेही त्यांनी नमूद केले.
मृत श्री. परदेशी यांच्या कुटुंबीयांना तातडीची आर्थिक मदत व नियमानुसार नुकसानभरपाई द्यावी. पुणे शहरातील सर्व सुरू असलेल्या रस्ते खोदकाम आणि ड्रेनेज कामांचे कालबद्ध सुरक्षा परीक्षण करून धोकादायक ठिकाणी तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही डॉ. गोऱ्हे यांनी केली आहे.
प्रस्तावित संयुक्त बैठकीत पोलीस तपासाची प्रगती, ठेकेदार व अधिकाऱ्यांची जबाबदारी, कुटुंबीयांना मदत आणि खोदकामांच्या ठिकाणची सुरक्षा व्यवस्था यांचा आढावा घ्यावा. या बैठकीस महापालिका व पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी, संबंधित पुणे मनपा विभागप्रमुख, श्री. आनंद गोयल आणि मृताच्या कुटुंबीयांच्या प्रतिनिधींना निमंत्रित करावे. प्राथमिक कार्यवाहीचा अहवाल तीन दिवसांत उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

