आयसरचे संचालक सुनिल भागवत यांच्या हस्ते गौरव ; नारी शक्तीचा सन्मान सोहळा
पुणे : भारताला विकसित राष्ट्राच्या दिशेने वाटचाल करताना गगनभरारी घेण्यात मोठी भूमिका बजावणाऱ्या महिला शास्त्रज्ञांचा सन्मान सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे करण्यात आला. भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन परिषदेचे (आयसर) संचालक डॉ. सुनिल भागवत यांच्या हस्ते सन्मान सोहळा पार पडला.
यावेळी विश्वकर्मा विद्यापीठ, पुणे उपाध्यक्ष प्रा. डॉ. वासुदेव गाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. मंदिर ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त व उत्सव प्रमुख डॉ.तृप्ती अग्रवाल, विश्वस्त भरत अग्रवाल, अॅड. प्रताप परदेशी, प्रवीण चोरबेले आदी मान्यवर देखील उपस्थित होते. कार्यक्रमात प्रा. डॉ. सुवर्णा दातार, डॉ. तेजश्री भावे, डॉ. पुराबी गाराई, डॉ. शिल्पा जैन, डॉ. मंजु मदान या महिला शास्त्रज्ञांचा गौरव करण्यात आला.
डॉ. सुनिल भागवत म्हणाले, विज्ञान आणि शिक्षण क्षेत्रात जबाबदारी व त्याचा परिणाम हे खूप महत्वाचे असते. विज्ञान समाजाला उत्तरदायी असले पाहिले, असे ज्येष्ठ शास्त्रज्ञ सी व्ही रमण यांनी सांगितले होते. पुढील पिढी ही स्पेस टेक्नालॉजीची आहे. या पिढीचे प्रश्न सोडविण्यावर आपण काम करावे. सरंक्षण आणि शिक्षण क्षेत्रात आजवर अनेक महिलांनी गौरवपूर्ण कामगिरी केली आहे. त्यांची परंपरा आपण पुढे चालू ठेवली आहे, याचा खूप आनंद होतो.
भरत अग्रवाल म्हणाले, मंदिरातर्फे नवरात्रोत्सवात नारी शक्तीचा सन्मान करण्यात येतो. आपल्यासारख्या संशोधक महिलांनी आपल्या कर्तृत्वाने मानवी जीवन अधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. आपल्या कार्याचा सन्मान करण्याचे भाग्य आम्हाला लाभले, असेही त्यांनी सांगितले. यावेळी युवराज लाहोटी यांनी प्रास्ताविक केले़, विशाल सोनी यांनी महिला शास्त्रज्ञांचा परिचय करुन दिला. महाआरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.

