अजितदादांचे सहकार क्षेत्रातील कार्य पुढे नेणार; सुनेत्रावहिनी पवार यांची ग्वाही
शेतकऱ्यांच्या कष्टांची जाणीव ठेवूनच प्रत्येक निर्णय घेणार – सुनेत्रावहिनी पवार
माळेगाव कारखान्याच्या प्रगतीचा लाभ कामगारांनाही मिळावा – सुनेत्रावहिनी पवार
माळेगाव कारखान्याची आर्थिक शिस्त राखत सभासदांचे हित जपणार – सुनेत्रावहिनी पवार
७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; कमी पाण्यात अधिक ऊस उत्पादनासाठी प्रयत्न करणार
बारामती,माळेगाव : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ व गव्हाण पूजन उपमुख्यमंत्री तथा कारखान्याच्या चेअरमन श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित सभासदांशी संवाद साधताना त्यांनी कारखान्याचे हित, शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य, कामगारांचे योगदान आणि आगामी काळातील पाणी व्यवस्थापन यावर भर दिला.
“माळेगाव कारखान्यावर अनेक शेतकरी सभासदांचे प्रपंच अवलंबून आहेत. त्यामुळे प्रत्येक निर्णय घेताना शेतकऱ्यांच्या कष्टांची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात चांगला ऊस पिकावा आणि प्रत्येक सभासदाच्या घरात सुख-समृद्धी नांदावी, हीच माझी प्रार्थना आहे,” असे सुनेत्रावहिनी पवार यांनी सांगितले.
स्वर्गीय अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना त्या म्हणाल्या, “अजितदादांचे या कारखान्यासाठीचे योगदान आणि मार्गदर्शन अत्यंत मोलाचे होते. त्यांच्या निधनानंतर १२ मार्च रोजी माझ्याकडे चेअरमनपदाची जबाबदारी आली. दादांनी सभासदांचे हित जपून ज्या पद्धतीने काम केले, त्याच पद्धतीने काम करण्याची माझी भूमिका आहे.”
कारखान्याने यंदा सर्वाधिक ऊसदर दिल्याचे सांगत त्यांनी आर्थिक शिस्तीचे महत्त्वही अधोरेखित केले. कारखान्याच्या माध्यमातून लवकरच सीबीजी प्रकल्प सुरू करण्यात येणार असून, भविष्यातील विकासासोबतच कामगारांच्या योगदानाचा योग्य सन्मान व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
यंदा कमी पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा उल्लेख करत त्या म्हणाल्या, “मराठवाड्यातील दौऱ्यात पाण्याची गंभीर समस्या पाहायला मिळाली. त्यामुळे आगामी काळात पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. कमी पाण्यात अधिक ऊस उत्पादन कसे घेता येईल, यासाठी प्रयत्न केले जातील. दुष्काळी परिस्थितीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी नियोजनावर भर दिला जाईल.”
कारखान्याच्या यशात कष्टकरी कामगारांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगत सुनेत्रावहिनी पवार यांनी त्यांच्या मेहनतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “सभासदांचे हित हेच कारखान्याचे हित असून, स्वर्गीय अजितदादांनी दाखवलेल्या मार्गावरून कारखान्याची वाटचाल सुरू ठेवणार,” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

