‘देश आमचा देह आहे, तरी आम्ही बोलू नये..?’ कार्यक्रमात विद्रोही कवितांना उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे-महात्मा गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या वतीने कोथरूड येथील गांधी भवनमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताह २०२६ अंतर्गत ‘देश आमचा देह आहे, तरी आम्ही बोलू नये..?’ या वैचारिक कवितांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सामाजिक विषमता, जातीय तेढ, शेतकऱ्यांची दुरवस्था, तरुणाईचे प्रश्न, गांधी-विचार आणि संविधानाची मूल्ये अशा विविध विषयांवरील कवितांनी कार्यक्रमाला वैचारिक आणि सामाजिक आशयाची उंची मिळाली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सायली मनोहर यांनी संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन केले. सूत्रसंचालन करताना प्रशिक तायडे यांनी सामाजिक विषयांवरील वैचारिक आणि विद्रोही कविता या कार्यक्रमातून सादर होत असल्याचे सांगितले. कवी रवींद्र कांबळे यांनी ‘तरी आपण बोलू नये’ ही कविता सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर ‘झाडे चहूकडे पण छाया कुठेच नाही, नाती अनेक झाली पण माया कुठेच नाही…’ या सामाजिक आशयाच्या गझलेला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
कवी किशोर आणि कवयित्री श्रेया यांच्या कवितांनी श्रोत्यांना भावविश्वात गुंतवून ठेवले. हृदयमानव अशोक यांनी ‘मीच तुमचा कर्दनकाळ’ या कवितेतून सामाजिक परिस्थिती आणि ‘जेन-झी’ पिढीसमोरील विविध प्रश्न मांडले. आवाजातील चढ-उतार आणि प्रभावी सादरीकरणामुळे त्यांच्या कवितेला विशेष प्रतिसाद मिळाला. सुभाष दवडे यांनी ‘मजबुती का नाम महात्मा गांधी’ या कवितेतून गांधी विचारांची महती अधोरेखित केली.
किशोर यांनी ‘आपण रमतो आपल्या भारत देशात…’ या कवितेतून जाती-धर्माच्या नावावर निर्माण होणारी तेढ, विषमता आणि सामाजिक अस्वस्थतेवर भाष्य केले. तरुण कवी विजय लोखंडे यांनी ‘आपल्या दोघांचे लग्न होण्यापूर्वीच लग्न लावून द्यावे का तुझ्या जातीचे माझ्या जातीशी?’ या कवितेतून आंतरजातीय विवाह आणि जातीय मानसिकतेवर प्रश्न उपस्थित केला. ‘जात पाहून प्रेम करावे का?’ असा थेट सवाल करत त्यांनी उपस्थितांना अंतर्मुख केले.
प्रशिक तायडे यांनी ‘झेंडेवाले’ या कवितेतून झेंड्यांच्या राजकारणावर भाष्य केले. कवयित्री प्राजक्ता यांनी गांधींना केवळ नोटांवरील चित्र किंवा ‘राष्ट्रपिता’ या चौकटीत मर्यादित ठेवण्याच्या मानसिकतेवर उपरोधिक भाष्य केले. ‘हा देश म्हणजे फक्त लुटारूंचा देश नाही, कोणत्याही नेत्याची खासगी मालमत्ता नाही’ या आशयातून देशातील शेवटच्या घटकाचा आवाज म्हणजेच देश असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
हृदयमानव अशोक यांनी ‘गांधीवादी होण्यासाठी गांधी जगावे लागतात…’ या कवितेतून गांधी विचारांच्या आजच्या संदर्भावर भाष्य केले. विजय यांनी ‘बा भीमा, तू अजूनही जिवंत आहेस आमच्या मनात’ या कवितेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याची आठवण करून दिली. किरण प्रकाश यांनी ‘दुष्काळातील शेतकरी’ या कवितेतून शेतकऱ्यांच्या दुरवस्थेचे वास्तव मांडले.
कार्यक्रमाच्या शेवटी ज्येष्ठ कवी आणि आयोजक अशोक आप्पा सोनवणे यांनी दारूबंदीच्या विषयावर ‘बेवडा शूट’ ही कविता सादर केली. ते म्हणाले, “काळाच्या ओघात अनेक कविता नामशेष झाल्या. त्या पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम मी गेली ४० वर्षे विविध कार्यक्रमांतून करीत आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातून आलो, रिक्षाचालक झालो; मात्र कवितेने मला सामाजिकदृष्ट्या श्रीमंत केले.” सामाजिक संदेश देताना कोणाचे मन दुखावणार नाही, याची काळजी घेऊन राज्यभर कार्यक्रम करण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.
महात्मा गांधी स्मारक निधीचे कार्यकर्ते आकाश आप्पा लक्ष्मण यांनीही कविता सादर केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तेजस भालेराव यांनी केले, तर आभार सूरज कुलकर्णी यांनी मानले. यावेळी अन्वर राजन, रमेश आढाव, बाळासाहेब कदम, श्रीराम टेकाळे, मुकुंद भाळकर, तेजस भालेराव, सूरज कुलकर्णी, चंद्रकांत जाधव, सत्यजीत कदम, हर्षवर्धन जाधव आदी उपस्थित होते.

