पुणे, दि. ०४ जानेवारी २०२३: महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी व अभियंता संघर्ष समितीने मंगळवारी (दि. ३) मध्यरात्रीनंतर ७२ तासांचा संप पुकारला होता. हा संप बुधवारी (दि. ४) सायंकाळी मागे घेण्यात आला आहे. या संपात दिवसभराच्या पाळीमध्ये पुणे परिमंडलातील ९२ टक्के कर्मचारी, अभियंता व अधिकारी सहभागी झाले होते. तर दुसरीकडे मर्यादित मनुष्यबळाच्या आधारे विविध कारणांनी खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी सर्व वरिष्ठ अधिकारी रात्रभरापासून ‘ऑन फिल्ड’ होते. त्यामुळे प्रामुख्याने पाणी पुरवठा योजना, मोठी रुग्णालये, मोबाईल टॉवर्स, शासकीय कार्यालये आदींसह वीजपुरवठा सुरळीत राहिला.
या संप कालावधीत पुणे शहरामध्ये प्रामुख्याने सिंहगड रोड, वडगाव, हिंगणे, धायरी या परिसरात पहाटे तीनच्या सुमारास वीजपुरवठा खंडित झाला होता. एकामागे एक तांत्रिक बिघाड होत गेल्याने अभिरूची, लिमयेनगर, प्रयागा हे तीन उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद पडला. परिणामी त्यामुळे सुमारे ३० हजार वीजग्राहकांची मोठी गैरसोय झाली. गंभीर बिघाड लक्षात घेता कार्यकारी अभियंता श्री. मनीष सूर्यवंशी व श्री. केशव काळूमाळी यांनी कंत्राटदार एजन्सीच्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने बिघाड शोधणे व दुरुस्ती कामाला सुरवात केली. महावितरणचे प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. अंकुश नाळे, मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार, अधीक्षक अभियंता श्री. प्रकाश राऊत यांनी भेट देऊन दुरुस्ती कामांची पाहणी व तांत्रिक मार्गदर्शन केले. त्यानंतर आज दुपारी ३.३० च्या सुमारास सर्व परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.
तसेच पुणे शहरातील शिवणेमधील उत्तमनगर, वाकड व सांगवीमधील काही परिसर, सुस रोड, म्हाळुंगे, पाषाण, धनकवडी, आंबेगाव, कात्रज, गोकूळनगर, भिलारेवाडी, रामटेकडी, हडपसर गाडीतळ, बीटी कवडे रोड, टिंगरेनगर, मोहननगर, प्रेस कॉलनी, कोथरूडमधील शास्त्रीनगर आदी परिसरात विविध कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. यातील बहुतांश भागात वीजपुरवठा सुरळीत झाला असून उर्वरित ३० टक्के भागांमध्ये दुरुस्ती कामांद्वारे रात्री ७ वाजेपर्यंत वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येत आहे.
यासोबतच चाकण एमआयडीसीमधील पाच वीजवाहिन्या तसेच तळेगाव शहर, इंदोरी, वडगाव, सोमाटणे, नाणेकरवाडी, कुरळी, कडूस गावांना वीजपुरवठा करणाऱ्या वीजवाहिन्यांमध्ये बिघाड झाला होता. मात्र युद्धपातळीवर दुरुस्ती कामे करून सर्व वीजपुरवठा दुपारपर्यंत पूर्ववत करण्यात आला आहे. तसेच जुन्नर, ओतूर गावांमधील वीजपुरवठा खंडित झाला होता. तो देखील सायंकाळपर्यंत टप्प्याटप्प्याने सुरळीत करण्यात आला. भोसरी एमआयडीसी सेक्टर ७ तसेच कुदळवाडी, देहू गाव, बोऱ्हाडेवाडी, चिखली तसेच निगडीमधील ओटा स्कीम परिसरातील वीजपुरवठा विविध बिघाडांमुळे खंडित झाला होता. सायंकाळी उशिरापर्यंत या परिसरात वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.
या संपामध्ये कर्मचाऱ्यांच्या ३२ संघटना सहभागी झाल्यामुळे पुणे परिमंडलामधील वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे मोठे आव्हान होते. मंगळवारी मध्यरात्रीपासून सर्व कार्यकारी अभियंता नेमून दिलेल्या विभागांमध्ये निवडसूचीवरील कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्यांसह ‘ऑन फिल्ड’ होते. नियंत्रण कक्षाद्वारे वीजपुरवठा खंडित झाल्याच्या प्राप्त माहितीनुसार वीजपुरवठा सुरळीत करण्याचे युद्धपातळीवरील काम आज सायंकाळपर्यंत सुरु होते.