कायद्याने प्रस्थापित ,शुल्क समितीने निर्धारित केलेले शुल्कच शाळेत आकारले जात असल्याचा दावा
पुणे :क्लाईन मेमोरियल स्कुल ही अल्पसंख्यांक विनाअनुदानीत शाळा असून अनेक पालकांनी वर्षानुवर्षे शैक्षणिक शुल्क न भरल्याने किमान ४ कोटी रुपये बोजा निर्माण झाला आहे, असा दावा करत ,अशा परिस्थितीत शाळेचे व्यवस्थापन, प्रशासन, दैनंदिन संचालन करणे अवघड असल्याने पालकांनी वस्तुस्थिती समजावून घेऊन शैक्षणिक शुल्क भरावे,असे आवाहन क्लाईन मेमोरियल स्कूलने आज पत्रकाद्वारे केले आहे .
आज बिबवेवाडी येथील शाळेच्या आवारात येऊन पालकानी ,राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मुख्याध्यापकांची भेट देऊन शैक्षणिक शुल्क कमी करण्याचा आग्रह धरला. तसेच शैक्षणिक शुल्क थकलेल्या विद्यार्थ्यांना देखील परीक्षेला बसू देण्याची विनंती केली.त्यावेळी प्राचार्या सुनंदा सिंग आणि संस्थेचे कायदे सल्लागार तसेच व्यवस्थापन प्रतिनिधी एड. मार्कस देशमुख यांनी पालकांशी संवाद साधला.
कायद्याने प्रस्थापित शुल्क समितीने निर्धारित केलेले शुल्क च या शाळेतही आकारले जात आहे. वेळेत शुल्क भरण्याबाबत पालकांना २३ सप्टेबर रोजी शाळेने पूर्वसुचित केले होते, असे शाळेच्या प्राचार्या सुनंदा सिंग यांनी पत्रकाद्वारे कळवले आहे.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबद्दल शाळा संवेदनशील आहे, काळजी घेत आहे.मात्र, काही पालक जाणीवपूर्वक शैक्षणिक शुल्क भरत नाहीत आणि ते माफ करण्याचा आग्रह धरतात .दबाव आणतात आणि काही संघटनांना सोबत घेऊन आंदोलन करतात. शाळेचे प्रशासन आणि व्यवस्थापन, दैनंदिन कार्य सुरळीत चालवायचे असेल तर शैक्षणिक शुल्क भरणे अत्यंत गरजेचे आहे ,हे व्यवस्थापनाने आज पालकांना समजावून सांगितले आहे. आणि सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. यावेळी शाळेच्या प्राचार्या सुनंदा सिंग , संस्थेचे कायदे सल्लागार तसेच व्यवस्थापन प्रतिनिधी अॅड.मार्कस देशमुख यांनी पालकांशी संवाद साधला.
त्याच बरोबर येत्या 19 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता याबाबत पुढील बैठक घेतली जाईल,असे यावेळी सांगण्यात आले.
