पुणे-यंदाच्या ३४ व्या पुणे फेस्टिव्हल मधील सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल बालगंधर्व रंग मंदिर आणि कोथरूडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात असणार आहे याबाबतची माहिती आज येथे काका धर्मावत आणि मोहन टिल्लू यांनी दिले आहे ते म्हणाले,’संतूर वादन, सतार वादन, सतार जुगलबंदी, सतार व व्हायोलिन जुगलबंदी, जलतरंग व बासरी जुगलबंदी, हास्योत्सव एकपात्रींचा, मराठी हास्य कवी संमेलन, हिंदी हास्य कवी संमेलन, मराठी धमाल नाटक, ‘ग्रिप्स’ चळवळीतील दोन नाटके, नारदीय कीर्तन महोत्सव, महिलांसाठी लावणी, व्हाॅईस ऑफ पुणे फेस्टिव्हल स्पर्धा, महिलांची पेंटिंग स्पर्धा व प्रदर्शन, महिलांच्या नृत्य स्पर्धा, महाराष्ट्राची सणयात्रा, केरळ महोत्सव ,मिसेस पुणे फेस्टिव्हल स्पर्धा असे भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम ३४व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये श्री गणेश कला क्रीडा रंगमंच व्यतिरिक्त बालगंधर्व रंगमंदिर व कलादालन आणि यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे संपन्न होणार आहेत. या सर्व कार्यक्रमांसाठी विनामूल्य प्रवेशिका उपलब्ध असतील.
बालगंधर्व रंगमंदिरातील कार्यक्रम :
बालगंधर्व रंगमंदिर येथे शनिवार दि. ३ सप्टे. रोजी रात्रौ ९.३० वाजता ‘हिंदी हास्य कवी संमेलन’ संपन्न होत आहे. त्यामध्ये सुभाष काबरा, सुमिता केशवा, मुकेश गौतम, महेश दुबे, राजेंद्र मालवीय, आशाकरण अटल हे राष्ट्रीय कवी सहभागी होत आहेत. मनीष आनंद व संगीता तिवारी यांनी याचे आयोजन केले आहे.
रविवार दि. ४ सप्टे. रोजी सायं. ५.३० पासून भरतनाट्यम, कथकली, कुचीपुडी, मोहिनीअट्टम, फ्युजन डान्स, क्लासिकल डान्स, कैकोटीकली, मार्गमकली आदी नृत्य प्रकारांद्वारे मल्याळी संस्कृतीची ओळख करून देणाऱ्या केरळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यात ४.५ लाख केरळवासीय राहत असून त्यांच्या 32 संस्थांच्या पुणे मल्याळी फेडरेशनचे चेअरमन राजन नायर आणि कॉ-ऑर्डिनेटर बाबू नायर यांनी याचे आयोजन केले आहे.
दि. ५ सप्टे. रोजी सायं. ५.३० वाजता, ‘रेनबो अम्ब्रेला’ निर्मित ‘ग्रिप्स’ चळवळीतील दोन नाटके सादर होतील. यामध्ये विभावरी देशपांडे लिखित व दिग्दर्शित ’प्रोजेक्ट आदिती’ हे नाटक आणि श्रीरंग गोडबोले यांनी लिहिलेले व संकेत पारखे दिग्दर्शित ‘छान छोटे वाईट मोठे‘ ही नाटके सादर केली जातील. त्याचदिवशी रात्रौ ९.३० वाजता सध्या गाजत असलेले लक्ष्मी प्रॉडक्शनचे ‘बायको कमाल मेहुणी धमाल’ हे धमाल विनोदी मराठी नाटक आयोजित केले असून अभिनेते दीपक रेगे, गौतमी देवस्थळी, वैभव लामतुरे, आरती शिंदे, स्वाती भिंगारदिवे आणि विजय पटवर्धन यांच्या भूमिका यात असून याचे लेखक व दिग्दर्शक जनार्दन लवंगारे आहेत.
मंगळवार दि. ६ सप्टे. रोजी सायं. ५.३० वाजता ज्येष्ठ सतारवादक उस्ताद रईस खान व उस्ताद हफिज खान यांची सतार जुगलबंदी रसिकांसाठी आकर्षण असेल. पाठोपाठ सायं. ७.३० वाजता पद्मविभूषण कै. पं. शिवकुमार शर्मा यांचे सुपुत्र राहुल शर्मा यांचे संतूर वादन संपन्न होईल.
बुधवार दि. ७ सप्टे. रोजी दुपारी १२.३० वाजता ‘तुझ्यात जीव रंगला’ हा केवळ महिलांसाठीचा लावणी महोत्सव आयोजित करण्यात आला असून अर्चना जावळेकर, प्राची मुंबईकर, संगिता लाखे, किरण पुणेकर, नमिता पाटील या लोककलावंत यामध्ये सहभागी होतील. संयोगिता कुदळे व दिपाली पांढरे यांनी याचे आयोजन केले आहे. याच दिवशी सायं. ५.३० वाजता रसिकांचे आकर्षण असणारा ‘हास्योत्सव एकपात्रींचा’ हा कार्यक्रम होत असून दिलीप हल्ल्याळ, चैताली माजगावकर–भंडारी, मकरंद टिल्लू इत्यादी कलावंत यात सहभागी होत आहेत. ‘हसायदान फौंडेशन’चे मकरंद टिल्लू यांनी याचे आयोजन केले आहे. या दिवशी रात्रौ ९.३० वाजता ‘महाराष्ट्राची सणयात्रा’ हा चैत्रातील गुढीपाडव्यापासून ते फाल्गुनातील होळी इथपर्यंतचा सणांचा अविष्कार सादर करणारा विशेष कार्यक्रम ‘स्वरांश एटरटेनमेंट’ तर्फे शैलेश लेले सादर करतील.
गुरुवार दि. ८ सप्टे. रोजी सायं. ५.३० वाजता ‘नारदीय कीर्तन महोत्सव’ संपन्न होणार आहे. ह. भ. प. कीर्तन विशारद निवेदिता मेहेंदळे यांनी याचे संयोजन केले असून, मंगलाचरण कीर्तन, भक्ती संकीर्तन, नाम संकीर्तन, राष्ट्रीय कीर्तन आणि महिलांची चक्री कीर्तने १२ कीर्तनकार व ४ साथीदार सादर करतील. ह. भ. प. कीर्तन कलानिधी रामचंद्रबुवा भिडे या वेळी उपस्थित राहणार आहेत. या दिवशी रात्रौ ९.३० वाजता ‘हास्यधारा’ हे सदाबहार मराठी कवी संमेलन आयोजित केले असून ज्येष्ठ वात्रटीकाकार रामदास फुटाणे याचे सूत्रसंचालन करतील. ज्येष्ठ हास्य कवी फ. मु. शिंदे यांच्या वयाच्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांचा विशेष सत्कार या कवी संमेलनात केला जाईल. भरत दौंडकर, महेश कळूस्कर, तुकाराम धांडे, नारायण पुरी, नितीन देशमुख, अनिल दिक्षित, मृणालिनी कानिटकर, अंजली जोशी इत्यादी महाराष्ट्रातील नामवंत कवी या कवी संमेलनात सहभागी होत आहेत.
यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील कार्यक्रम :
३४व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातही वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार दि. ३ सप्टे. रोजी सायं. ५.३० वाजता युवा सतारवादक शाकीर खान व युवा व्हायोलीन वादक तेजस उपाध्ये यांची सतार व व्हायोलीन यांची जुगलबंदी रसिकांसाठी आकर्षण ठरेल.
रविवार दि ४ सप्टे. रोजी सायं. ५.३० वाजता ज्येष्ठ जलतरंग कलावंत पं.मिलिंद तुळाणकर आणि ज्येष्ठ बासरी वादक राजेंद्र कुलकर्णी यांची जलतरंग आणि बासरीची जुगलबंदी हा कार्यक्रमही वैशिष्ट्यपूर्ण ठरेल.
सोमवार दि. ५ सप्टे. रोजी सायं. ५.३० वाजता आंतराष्ट्रीय कीर्तीचे सतारवादक उस्ताद शुजात खान यांचा सतार वादनाचा कार्यक्रम रसिकांना मंत्रमुग्ध करेल.
मंगळवार दि. ६ सप्टे. रोजी ‘अर्घ्य’ हा पद्मविभूषण कै. पं. शिवकुमार शर्मा यांना पुणे फेस्टिव्हल तर्फे श्रद्धांजली वाहणारा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, त्यामध्ये सायं. ५.३० वाजता डॉ. शंतनू गोखले यांचा संतूर वादन आणि सायं. ६.४५ वाजता निनाद दैठणकर (संतूर) व रोहित मुजुमदार (तबला) हे कार्यक्रम संपन्न होतील. त्याच दिवशी रात्रौ ९.३० वाजता भारतरत्न कै. लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वहाणारा कार्यक्रम व्हाॅईस ऑफ पुणे फेस्टिव्हलचे गत विजेते कलावंत सादर करतील.
बुधवार दि. ७ सप्टे. रोजी दुपारी १२.३० वाजता ‘मंगळागौरीचे खेळ’ हा मनोवेधक कार्यक्रम होणार असून अजित कुमठेकर आणि रत्ना दहीवेलकर यांनी याचे संयोजन केले आहे. सायं. ५.३० वाजता व्हाॅईस ऑफ पुणे फेस्टिव्हलची अंतिम फेरी व पारितोषिक वितरण संपन्न होईल. अनुराधा भारती यांनी याचे संयोजन केले आहे.
गुरुवार दि. ८ सप्टे रोजी दुपारी. १२.३० वाजता महिलांसाठी नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. २० ते ३५ वर्षे आणि ३६ ते ५० वर्ष अशा २ गटात एकल नृत्य स्पर्धा आणि २० ते ५० वर्ष वयोगटात किमान १० महिला स्पर्धकांचा समावेश असणाऱ्या समूह नृत्य स्पर्धा पार पडतील. संयोगिता कुदळे आणि दीपाली पांढरे यांनी याचे आयोजन केले आहे. या दिवशी रात्रौ ९.३० वाजता ‘मिसेस पुणे फेस्टिव्हल’ स्पर्धा आयोजित करण्यात आली असून अमृथा जगधारे यांनी याचे आयोजन केले आहे. 34 व्या पुणे फेस्टिव्हलचे मुख्य प्रायोजक कोहिनूर ग्रुप असून उपप्रायोजक जमनालाल बजाज फाउंडेशन, नॅशनल एग को-ऑर्डिनेशन कमिटी, सिस्का आणि सहप्रायोजक भारत फोर्ज व पंचशील आहेत.