पुणे-पुण्यातील मार्कटयार्ड परिसरात मास्क लावून आलेल्या पाच ते सहा आराेपींनी गाेळीबार करत व्यापाऱ्यांची 28 लाख रुपयांची राेकड जबरदस्तीने पळवून नेल्याचा प्रकार शनिवारी दुपारी घडला आहे. अंगडिया ऑफिसमधून सदर आराेपींनी संबंधित राेकड पळवून नेताना त्यांच्या जवळील पिस्तुलमधून एक राऊंड फायर केल्याने खळबळ उडाली. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच, मार्केटयार्ड पाेलिस घटनास्थळी दाखल झाले असून पाेलिसांनी आराेपींचा शाेध सुरू केला आहे.
मार्केटयार्ड परिसरात पी.एम. अंगडिया यांचे कार्यालय आहे. ते कुरिअर कार्यालय असल्याची माहिती मिळत आहे. आज याठिकाणी पाच ते सहा जण आले त्यांनी गोळीबार करून 28 लाखांची रोकड घेऊन फरार झाले.तक्रारदार हे आज सकाळी 11 च्या सुमारास कार्यालयात आले. त्यानंतर त्यांनी पैसे तपासून पाहिले.
त्यानंतर पावणे बारा च्या सुमारास पाच ते सहा आरोपी ऑफिसमध्ये आले. त्यांनी दारातून पिस्तुल दाखवली. त्यानंतर दुसऱ्या साथीदाराने त्यांना ढकलून कार्यालयाच्या बाहेर काढलं. कार्यालयात असलेल्या काचेवर गोळीबार करुन काच फोडली. त्यानंतर आरोपी पैसे घेऊन पळून गेले, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी दिली. या घटनेत कोणी जखमी झाले नाही. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही तपासण्याचे काम सुरु आहे.