कात्रज-मांगडेवाडी परिसरातील एका बांधकामाच्या ठिकाणी इमारतीच्या पार्किंगमध्ये असलेल्या पाण्याच्या टाकीत 2 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. शुक्रवारी (11 नोव्हेंबरला) ही घटना घडली. सहानी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बांधकाम व्यावसायिक सचिन चोरगे आणि ठेकेदार शिवाजी पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कात्रज भागातील मांगडेवाडी परिसरात चोरगे यांच्याकडून नियोजित गृहप्रकल्पाचे बांधकाम करण्यात येत आहे. सुनील सहानी बांधकाम मजूर असून ते गृहप्रकल्पाच्या परिसरात कुटुंबीयांसह राहायला आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्सिका सुनील सहानी (वय-2) असे मृत झालेल्या चिमुरडीचे नाव आहे. याबाबत सुनील सहानी (वय-27,रा.मांगडेवाडी,पुणे) यांनी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. तक्रारदार सहानी हे सदर बांधकामाच्या ठिकाणी मजुरी काम करत हाेते. त्यावेळी पाण्याच्या टाकीस बांधकाम व्यवसायिक व ठेकेदार यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने टाकीस झाकण न लावता, चारही बाजूने सुरक्षित जाळी न लावता व काेणतेही सुरक्षा व्यवस्था, उपाय याेजना न करता पाण्याची टाकी उघडी ठेवली त्यामुळे संबंधित टाकीत पडून अन्सिका हिचा टाकीतील पाण्यात पडून दुर्दैवी मृत्यु झाला आहे. याबाबत पुढील तपास भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक नितीन जाधव करत आहे.