पुणे,
तो क्षण आता जवळ येऊन ठेपलाय… ज्याची कित्येक दिवसांपासून प्रतीक्षा होती. गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेला काकण हा सिनेमा येत्या 10 एप्रिल 2015 रोजी प्रदर्शित होत असल्याची माहिती मुंबईत झालेल्या दिमाखादार सोहळ्यात जाहीर करण्यात आली. या सिनेमाचं आकर्षण म्हणजे अभिनेत्री क्रांती रेडकर या सिनेमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे. त्यांची निर्मिती मँगोरेंज प्रॉडक्शन्सचे असून कथा-पटकथा- संवाद अन् गीते क्रांती रेडकर आणि मंगेश दत्त यांचे असून बिथिन दास यांची सिनेमॅटोग्राफी आहे तर महेश कुडाळकर यांनी कलादिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. 1970च्या काळातील एक प्रेमकथा इतकंच या सिनेमाचं मर्यादित स्वरूप नाही. तो काळ आपल्यासमोर उभा करणं अन् प्रेम या संकल्पनेतील उदात्त स्वरूपाची गोष्ट जी गोष्ट आपल्या आजच्या जगण्यातून हरवत चालली आहे. त्या गोष्टीला अधोरेखित करण्यात आले आहे.
काकण म्हणजे बांगडी… काकण ही एक शोकांतिका आहे… एका तरूण प्रेमी युगुलाची… ज्यांची त्या काळात एकमेकांपासून ताटातूट झाली आहे अन् कालांतराने ते एकमेकांसमोर येतात… त्या काळात तरी नियती त्यांच्यासोबत उभी राहते… नेमकं त्यांच्या प्राक्तनात काय लिहिलंय… हे आपल्याला सिनेमात उलगडत जातं. अत्यंत तरलपणे आयुष्यातील भूतकाळ अन् वर्तमान काळाची सांगड इथे घातली गेल्याचं आपल्याला दिसतं. कोकणाच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर हे सारं काही चित्रित करण्यात आलं आहे.
याप्रसंगी दिग्दर्शनाचं आव्हान पेलणारी क्रांती रेडकर म्हणाली की, आजच्या संगीत प्रकाशन सोहळ्यामधल्या गाण्यांनी एक मैफल सजली… त्यावर दमदार परफॉर्मन्स झाले… संगीतकार अन् गायकांनी या सोहळ्यामध्ये इंद्रधनु खुलवलं. आज मी खूप खूष आहे. यासोबत क्रांतीने पुस्ती जोडली ती म्हणाली की, दिग्दर्शन क्षेत्रात मी अपघाताने आले नाही. सिनेमाच्या तांत्रिक बाबी मला कायम आकर्षित करत राहिल्या होत्या. फिल्ममेकिंगकडे त्यामुळेच वळले. त्यामुळेच ज्यावेळी या सिनेमाची गोष्ट लिहिली अन् माझ्या आप्त स्वकीयांना ऐकवली. माझ्या आईवडिलांनी त्याक्षणी हा सिनेमा तू दिग्दर्शित करण्याचा सल्ला दिला… कारण तू या गोष्टीला न्याय देऊ शकतेस असा त्यांचं म्हणणं होतं.हा सिनेमा पूर्ण होणं हा माझ्या आयुष्यातील एक वेगळा अनुभव होतापण त्याक्षणी माझी संपूर्ण टीम कुटुंब, या क्षेत्रतील सहकारी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले म्हणून हा सिनेमा पूर्ण करू शकले हे मी जाणीवपूर्वक इथे नमूद करू इच्छिते. माझ्या टीमने प्रत्येक टप्प्यावर माझी साथ दिली आहे, त्यांचे या सिनेमाच्या पूर्णत्त्वामध्ये महत्त्वाचे योगदान आहे. त्यांची मी उतराई होऊ शकत नाही.दिग्दर्शनातील पदार्पणाच्या एका हुकमी एक्क्यानंतर आता क्रांती आपल्यासमोर गीतकार म्हणून येत आहे. काकण सिनेमातील दोन गाण्यांचे शब्द हे तिच्या लेखणीतून साकार झाले आहेत. क्रांतीचं ‘सुकी पोळी’ हे गाणं श्रीराम अय्यरच्या स्वरसाजाने अधिक गहिरं झालं आहे तर हमसिका अय्यरने मनाला साद घालणारे ‘साजणा’ सारखं दुसरं गाणं गायलं आहे. या गाण्याला गीतलेखनाला साह्य केलं आहे ते ओंकार मंगेश दत्त या गुणी गीतकाराने. या सिनेमातील आणखी तीन गाण्यांना ओंकारच्या शब्दकळेने अधिक खुलवलं आहे. तर अजय सिंघासारख्या प्रतिभावंत संगीतकाराच्या परिसस्पर्शाने संगीत एका वेगळ्या उंचीवर गेलं आहे. चर्चेत असलेल्या काकणच्या टायटल ट्रॅकला ख्यातनाम गायक शंकर महादेवनने आपल्या अनोख्या शैलीत पेश केलं आहे अन् त्यांना साथ लाभली आहे ती गुणी गायिका नेहा राजपालची. या सोबत श्रीराम अय्यरचे गोपी दादा… हे गाणं अन् वेड्यांचे घर उन्हात हे गाणं स्वप्नील बांदोडकरच्या मधाळ आवाजात ऐकताना अधिक रंगतदार वाटते.