पुणे
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं मार्चमध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून राज्यातील ९१.४६ टक्के विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणातील हा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे. कोकण विभागातील विद्यार्थ्यांनी निकालात बाजी मारली असून यंदाही मुलींनी मुलांना मागे टाकलं आहे.
यावर्षी राज्यभरातून १७ लाख ३२ हजार ८९८ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यांच्या करिअरची दिशा ठरवणारा, या परीक्षेचा ऑनलाइन निकाल आज दुपारी १ वाजता जाहीर झाला .
दहावीच्या परीक्षेत ९१.४६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून हा आजवरचा सर्वोत्तम निकाल आहे. गेल्या वर्षी दहावीचा निकाल ८८.३२ टक्के लागला होता. त्यात यंदा ३.१४ टक्क्यांची वाढ झाली आहे. उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ९०.१८ टक्के असून ९२.२४ टक्के मुली यशस्वी झाल्यात. २१ शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे, तर ४,७३१ शाळांमधील सर्वच्या सर्व विद्यार्थी पास झाले आहेत.