मुंबई-महायुतीचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी होणार असून मुख्यमंत्री पद तसेच खातेवाटपाबाबत कोणताही निर्णय झाला नाही. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून माघार घेतल्यानंतर एकनाथ शिंदे गृहमंत्री पदासाठी अडून बसल्याची माहिती आहे. अशातच आता महायुतीच्या खातेवाटपाचा संभाव्य फॉर्म्युला समोर आला आहे. यामध्ये भाजप स्वत:कडे 21 ते 22 खाती ठेवणार असल्याचे समजते आहे. यामध्ये गृह मंत्रालय तसेच सभापतीपद भाजपला मिळण्याची शक्यता आहे. भाजपकडून पंकजा मुंडे, अतुल सावे, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, आशिष शेलार, अतुल भातखळकर, शिवेंद्रसिंहराजे भोसले, चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. भाजपचे 16 मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती आहे.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे 11 ते 12 खाती मिळून शकतात. यामध्ये एकनाथ शिंदे, दादा भुसे, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, अर्जुन खोतकर, संजय राठोड आणि उदय सामंत यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.मात्र अगदी बिन महत्वाची आणि सामान्य दर्जाची मानली जाणारी खाती यांच्या गळ्यात मारली जाण्याची शक्यता वर्तविली जाते आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 10 खाती मिळणार असून अद्यापही कोणाला संधी मिळणार ही माहिती समोर आली नाही. मात्र, अर्थ खाते हे राष्ट्रवादीकडेच जाणार असल्याची माहिती आहे.
भाजपकडे गृह आणि महसूल सारखे खाते कायम राहू शकते. याशिवाय त्यांना सभापती आणि विधान परिषद अध्यक्ष पदही मिळू शकते. राष्ट्रवादीला अर्थ, तर शिंदेंच्या शिवसेनेला शहरी विकास खाते मिळू शकते. याशिवाय इतर खात्यांवर नंतर चर्चा केली जाणार आहे. तत्पूर्वी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे महायुतीचे तिनही नेते मुंबईत बैठक घेऊन नवीन मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा करणार आहेत. मात्र, कार्यवाहक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती अद्यापही खालावलेलीच असल्याने बैठका टळत आहेत.मुख्यमंत्रिपद भाजपकडे गेल्यानंतर एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. एकनाथ शिंदे गृह खात्यासाठी अडून बसल्याची माहिती होती. दरम्यानच्या काळात एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडल्याने महायुतीची बैठक झाली नाही. त्यामुळे खातेवाटपाबाबत चर्चा होऊ शकली नाही. पण आता शिंदेंच्या शिवसेनेकडून हालचाली सुरू असून उदय सामंतांनी देवेंद्र फडणवीसांची सागर बंगल्यावर भेट घेतली आहे. या भेटीत गुरूवारी होणाऱ्या शपथविधीच्या तयारीवर चर्चा झाली असून उदय सामंत यांनी देवेंद्र फडणवीसांसमोर शिवसेनेचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती आहे.